वाघनखं विकणाऱ्याला अमरावतीत अटक; मोबाईल टॉवरवरून मिळविले लोकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:41 PM2019-01-19T15:41:39+5:302019-01-19T15:42:58+5:30
वाघनखं विक्रीतील चिखलदरा येथील विक्रांत सुरपाटणे नामक आरोपीला शुक्रवार, १८ जानेवारीला सायंकाळी अमरावतीमधून वनअधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पूर्व मेळघाट वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी वाघनखं विकणाऱ्याला अमरावतीतून ताब्यात घेतले. वाघमिशीच्या शोधात आलेल्या वनअधिकाऱ्यांना ती वाघमिशी धारणीत असल्याची माहिती मिळाली आहे.
व्याघ्र प्रकल्पांतर्गत बंदरकहू परिसरातील मृत वाघाची नखे आरोपींकडून वनाधिकाऱ्यांनी यापूर्वीच हस्तगत केली आहेत. यात सात आरोपींना अटक करून त्यांच्या वनकोठडीनंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे. दरम्यान, वाघनखं विक्रीतील चिखलदरा येथील विक्रांत सुरपाटणे नामक आरोपीला शुक्रवार, १८ जानेवारीला सायंकाळी अमरावतीमधून वनअधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याला अमरावतीवरून परतवाड्याला आणण्यात आले आहे.
विक्रांतला ताब्यात घेण्याकरिता यापूर्वी चिखलदरा येथे वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे ते अमरावतीला त्याच्या शोधार्थ पोहचलेत. पण, तेव्हा त्याचे लोकेशन वर्धा मिळत होते म्हणून त्यांना खाली हात परतावे लागले. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात टायरवरील लोकेशननुसार त्याला अटक करण्यात वनाधिकारी यशस्वी ठरले. विक्रांतकडून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दरम्यान वनाधिकाऱ्यांनी वाघमिशीच्या शोधार्थ धारणी आणि आकोट-अकोला मार्गावरील चोहट्टाबाजार येथेही शोधमोहीम राबविली. यात ती वाघमिशी धारणीत असल्याचे संकेत मिळाले. संबंधित आरोपी धारणीतून पसार झाल्यामुळे आरोपी व वाघमिशी वनाधिकाऱ्यांच्या हाती लागलेली नाही.
वाघनखं विकणाऱ्या विक्रांतची वनाधिकाऱ्यांनी अचलपूर न्यायालयातून वनकोठडी मिळविली असून, त्यावर कडक पहारा ठेवण्याकरिता एक वनपाल व वनरक्षकास तैनात केले आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघमिशीशी संबंधित आरोपीला अटक करण्याकरिता ते प्रयत्नरत आहेत. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड हे प्रकरणाची चौकशी करीत आहेत. वनपाल विजय बारब्दे, सुधीर हाते त्यांना सहकार्य करीत आहेत.