ते थांब.. थांब म्हणून ओरडत राहिले अन् चोरटा डोळ्यादेखत कार घेऊन पळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 03:35 PM2021-12-08T15:35:19+5:302021-12-08T15:48:37+5:30
घराबाहेर उभे आपले वाहन कुणीतरी चोरून नेत असल्याचे लक्षात येताच बापलेकांनी जोरजोरात आरडाओरड केली. मात्र, तो चोर ती कार घेऊन रफुचक्कर झाला.
अमरावती : रात्री घरातील सर्व मंडळी बसून गप्पागोष्टी करत होते. इतक्यात त्यांना कार स्टार्ट करण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर जाऊन बघितले तर, कुणीतरी त्यांची कार चोरून नेताना दिसला. ते जोर-जोरात थांब-थांब म्हणून गाडीच्या मागे धावत सुटले अन् चोरटा सुसाट गाडी पळवत रफूचक्कर झाला.
फ्रेजरपुरा हद्दीतील राजपुरोहित नगरातून शासकीय चारचाकी वाहन पळविल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा वाहनधारकाच्या डोळ्यांदेखत चारचाकी वाहन पळवून नेण्यात आली. ही थरारक घटना ६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास एमआयडीसी भागात घडली. चोरांनी दुचाकीसोबतच आता चारचाकी वाहनांना लक्ष्य केले आहे.
एमआयडीसीतील रितेश नरेश वर्मा (४०) हे ६ डिसेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसोबत गुजगोष्टी करत होते. त्यांनी आपली एमएच ०२ केए १४४० ही कार घराच्या आवारात ठेवली होती. रितेश हे घरी असताना रात्री ११.३० च्या सुमारास त्यांना आवारातील कार चालू करण्याचा आवाज आला. त्या आवाजामुळे रितेश व त्यांचे वडील नरेश वर्मा हे दार उघडून घराबाहेर आले. त्यांना धक्काच बसला. त्यांची महागडी कार कुणीतरी चालू करून चोरून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दोघांनीही त्या कारच्या दिशेने थांबा, थांबा अशी ओरड केली. मात्र, ती आरडाओरड कानावर न घेता तो अज्ञात चोर त्यांची कार घेऊन पळाला. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशाली काळे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली.
सलग दुसऱ्या दिवशी घटना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयाचे एमएच २७ एए ००८१ हे चारचाकी वाहन राजपुरोहितनगर भागातून ६ डिसेंबर रोजी पहाटे १.३० च्या सुमारास पळविण्यात आले होते. त्यावेळीदेखील कारचालकाला आवाज आल्याने त्याने आरडाओरड केली. मात्र, तो चोर थांबला नाही. त्यामुळे वाहनचालक मेश्राम यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली होती. ते शासकीय वाहन ६ डिसेेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेवसा शिवारात बेवारस स्थितीत आढळले होते. सलग दुसऱ्या दिवशी कार चोरीची घटना घडली आहे. केवळ बदलले ते पोलीस ठाणेच.