चोरट्यांची आता खैर नाही !
By Admin | Published: October 29, 2015 12:29 AM2015-10-29T00:29:38+5:302015-10-29T00:29:38+5:30
शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविण्यासोबतच सर्वाधिक चोऱ्या झालेल्या...
सीपींचे प्रभावी पाऊल : फिक्स पाँइंट, पोलिसांची गस्त वाढविली
अमरावती : शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविण्यासोबतच सर्वाधिक चोऱ्या झालेल्या परिसरात ‘फिक्स पॉइंट’ लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाने चोरट्यांची खैर नसल्याचे दिसून येते.
अलीकडच्या काळात शहरात दररोज चार ते पाच घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. यातील सर्वाधिक चोऱ्या या राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस नवरात्रौत्सवाच्या बंदोबस्तात तैनात असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे होते. मात्र, आता नवरात्रौत्सव संपल्यामुळे पोलिसांनी चोरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलीस आयुक्तांनी चार्ली कमान्डो व्यतिरिक्त विभागीय पेट्रोलिंग, पोलीस ठाण्यांचे पेट्रोलिंग आणि गुन्हे शाखेकडून विशेष पेट्रोलिंग वाढविले आहे. तसेच ‘सीआर’ मोबाईल वाहने सुध्दा पेट्रोलिंगसाठी सज्ज राहणार आहेत. राजापेठ, गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून फे्रजरपुरा व कोतवाली ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. याशिवाय शहरातील १० ‘सीआर’ मोबाईल वाहनापैकी ८ वाहने केवळ चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्तीवर राहणार आहेत. बडनेरा आणि नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीसाठी प्रत्येकी एक ‘सीआर’ मोबाईल वाहन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)