चोरांनी चार व्यापारी प्रतिष्ठाने फोडली; राठीनगरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:14 PM2019-07-01T23:14:38+5:302019-07-01T23:15:11+5:30
अज्ञात चोरट्यांनी जुन्या कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील तीन व मोचीगल्लीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून तब्बल १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका व्यापारी प्रतिष्ठानातही चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. दोन अल्पवयीनांनी ही व्यापारी प्रतिष्ठाने फोडल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अज्ञात चोरट्यांनी जुन्या कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील तीन व मोचीगल्लीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून तब्बल १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका व्यापारी प्रतिष्ठानातही चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. दोन अल्पवयीनांनी ही व्यापारी प्रतिष्ठाने फोडल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.
खत्री कॉम्प्लेक्स येथे तेजपाल साधवानी (५०, रा. अनुपनगर, रहाटगाव) यांचे इलेक्ट्रीकल, राहुल मोहनलाल चावला (२८, रा. शकंरनगर) यांचे टेलरिंग साहित्य, व कमलेश जयसिंघानिया (३२, रा. कृष्णानगर, रामपुरी कॅम्प) यांचे प्लम्बिंग साहित्य विक्रीचे प्रतिष्ठान आहे. सोमवारी सकाळी प्रतिष्ठाने उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांना शटर खालच्या बाजूने वर वाकलेले दिसले. प्रतिष्ठानातून चोरांनी साहित्य लंपास केल्याचेही निदर्शनास आले. मोची गल्लीतील ताहा अलसीसर जामनगरवाला (३३, रा.बोहरा गल्ली) यांच्या दुकानातून १० हजारांची रोकड व ९ हजारांचा सीसीटीव्ही लंपास करण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक श्रीकांत नारमोडे यांच्या पथकाने पंचनामा केला. चोरांनी साधवानी यांच्या प्रतिष्ठानातून ७५ हजार व चावला यांच्या प्रतिष्ठानातून ३५०० रुपयांचे साहित्य, तर जयसिंघांनियांच्या प्रतिष्ठानातून ४४०० रुपये रोख लंपास केले. कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
ऐवज लंपास
अमरावती : राठीनगरातील एका घराचे कुलूप तोडून चोरांनी तब्बल ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
राठीनगरातील रहिवासी भैरवी अमर ढवळे ही महिला ३० जून रोजी कुटुंबीयांसह गोविंदनगरात मावशीच्या घरी गेल्या होत्या. रविवारी रात्री घरी परतल्या असता, त्यांना दाराचे कुलुप तुटलेले दिसले. घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त स्थितीत आढळून आले. चोरांनी कपाटाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने पाचारण करून तपासकार्य सुरू केले. या घटनेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
दोन अल्पवयीनांवर संशय
घरफोड्या, दुचाकी चोरीमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दुचाकीचोरींची कबुली दिली आहे. व्यापारी प्रतिष्ठानांतील चोरीच्या गुन्ह्यातही या अल्पवयीनांचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. त्यामुळे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
सुरक्षेचा अभाव
खत्री कॉम्प्लेक्समध्ये पन्नासेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. तथापि, या व्यापारी संकुलात सुरक्षा रक्षक नाही. काही व्यापाऱ्यांकडे सीसीटीव्ही आहेत; मात्र, ते बंद अवस्थेत आहेत. त्यातच रात्रीच्या वेळेत प्रवेशद्वाराचे शटर बंद केले जात असल्यामुळे तेथे पोलिसांची गस्त लावता येत नाही. कोतवाली पोलीस व्यापाºयांना पत्र देऊन सुरक्षा रक्षक ठेवण्याची विनंती व गस्त लावण्यासाठी प्रवेशद्वार उघडे ठेवण्यास सांगणार आहे.