कारागृहातील सागवान वृक्षांवर चोरट्यांची नजर
By admin | Published: April 12, 2017 12:35 AM2017-04-12T00:35:59+5:302017-04-12T00:35:59+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अखत्यारीतील सागवान वृक्षांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.
दिवसा ‘प्लॅनिंग’ रात्री ‘गेम’: प्रशासनाचे दुर्लक्ष
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अखत्यारीतील सागवान वृक्षांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दिवसा ‘प्लॅनिंग’ रात्री ‘गेम’ अशी शक्कल चोरट्यांकडून लढविली जात आहे. दरदिवसाला चार ते पाच वृक्षांची कत्तल करून लाखोंच्या संपदेची चोरी होत असताना याकडे कारागृह प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कारागृहाच्या मागील बाजूस नागपूर राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता निर्मितीमुळे सागवानाची शेकडो झाडे विभागली गेली.
कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह
अमरावती : यात स्थानिक दंत महाविद्यालय मार्गालगत कारागृहाच्या मालकीचे शेकडो सागवान वृक्ष आहेत. मात्र, ही झाडे बेवारस असल्याने चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. लाखोंचे सागवान बेवारस ठेवणाऱ्या कारागृह प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सागवानाच्या जंगलात दिवसा दारूच्या पार्ट्या आणि रात्री गैरप्रकार होत असल्याचे येथे आढळून आलेल्या साहित्यावरून दिसून येते. यापूर्वीचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सागवान वृक्षाच्या संरक्षणासाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले होते. इतकेच नव्हे, तर परिसरात तात्पुरती झोपडीदेखील उभारण्यात आली होती. मात्र, जाधव यांची बदली होताच सागवान वृक्ष बेवारस पडून आहेत. परिसरात किती सागवान वृक्ष आहेत, याची नोंद कारागृह प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कारागृह प्रशासन स्वत:च्या संपदेचे संरक्षण करू शकत नसेल तर कैद्यांवर वॉच कसा ठेवणार, असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील
वळण धोक्याचे
कारागृहाच्या मागील बाजूने गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता भविष्यात कारागृहाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षेसाठी अतिशय धोकादायक ठरणारा आहे. वळणमार्गावरून कारागृहाच्या आतील हालचाली टिपता येतात.
हल्ली कारागृहात नक्षलवादी, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊदचे समर्थक आदी प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपी येथील कारागृहात जेरबंद आहेत. त्यामुळे हा वळण मार्ग धोकादायक ठरू शकतो. त्यादृष्टीने कारागृह प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
कारागृहाच्या मालकीच्या सागवान वृक्षांची चोरी होत असेल तर ही गंभीर बाब आहे. सागवान वृक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ.
- रमेश कांबळे, अधीक्षक,
मध्यवर्ती कारागृह अमरावती.