शिवारातील साहित्यावर चोरट्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:25+5:302020-12-03T04:23:25+5:30
गुरुकुंज (मोझरी) : तिवसा तालुक्यात चोरट्यांचा हैदोस सुरू असून, नागरी वस्तीमध्ये धूडगुस घातल्यानंतर आता शिवाराकडे त्यांची नजर वळली आहे. ...
गुरुकुंज (मोझरी) : तिवसा तालुक्यात चोरट्यांचा हैदोस सुरू असून, नागरी वस्तीमध्ये धूडगुस घातल्यानंतर आता शिवाराकडे त्यांची नजर वळली आहे. त्यामुळे शेतातील साहित्याच्या रक्षणार्थ शेतकरी शिवारात शेकोटीच्या साह्याने रात्री जागून काढत
आहेत. अप्पर वर्धा कॅनॉलला काही दिवसांपासून पाणी सोडले आहे. त्यामुळे शेंदूरजना बाजार शिवारात मोठ्या प्रमाणात ओलित सुरू आहे. बहुतेक शिवारात मोठ्या प्रमाणात कृषिसाहित्य पडून आहे. त्यामध्ये तुषार सिंचनाचे पाईप, मोटरपंप, डिझेल इंजिन, स्टार्टर आहे. शेतीसाठी वीजपुरवठा बहुतांश रात्रीच राहतो. त्याचबरोबर चोरट्यानी आता आपला मोर्चा शिवाराकडे वळविल्याने शेतकरी आता रात्रीचा दिवस करीत आहेत.
तिवसा तालुक्यात बिबट्या वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या असतानाही शेतकरी आता जिवाची पर्वा न करता ट्रॅक्टरच्या ट्रॉली, बैलबंडीच्या साहाय्याने संघटितरीत्या जागल करीत आहेत. दोन दिवसांआधी तिवसानजीक शिक्षण महाविद्यालय परिसरात चोरीचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला. एकूणच चोरीच्या घटनांचा वाढता आलेख बघता पोलीस यंत्रणेमधील उणिवा अधिक गडद झाल्या आहे, हे निश्चित.
-------------------------------------------------------------------
तरुणांमधील चमकोगिरी चाचपण्याजोगी
तालुक्यात काही नजरेत भरणारे युवक दिवसाउजेडी व्यवसाय वा नोकरी करताना निदर्शनास येत नाही. पण, त्यांचे राहणीमान चांगले राहते. कोणत्या उत्पनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे ही समृद्धी आली आहे, याचा शोध घेणे यानिमित्ताने पालकांची जबाबदारी ठरली आहे.