'लिफ्ट' देणे पडले महागात; युवकाचे हातपाय बांधून पळवली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 03:00 PM2021-10-11T15:00:54+5:302021-10-11T15:11:23+5:30
लिफ्ट देणे खानापूर येथील युवकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या दुचाकीसह मोबाईल व रोकड हिसकावून अनोळखी इसमांनी धूम ठोकली. एवढेच नव्हे तर त्याच्याच खांद्यावरील दुपट्ट्याने हातपाय बांधून त्याला गप्प बसविले.
अमरावती : दुचाकीने जात असताना वाटेत कुणी मदत मागितली तर, सहकार्याची भावना ठेवत आपण लिफ्ट देत माणूसकी पाळतच असतो. परंतु, एका दुचाकीस्वाराला हेच महागात पडले आहे. चोरट्यांनी त्याच्या दुचाकीसह मोबाईल व रोकड हिसकावून अनोळखी इसमांनी पळ काढला. एवढेच नव्हे तर त्याच्याच खांद्यावरील दुपट्ट्याने हातपाय बांधून त्याला गप्प बसविले.
खानापूर येथील बाबा ऊर्फ अतुल गुलाबराव ठाकरे (३६) हे ७ ऑक्टोबर रोजी जाण्याकरिता अतुल यांनी मदतनीस पंकजसिंह कुमार यांची दुचाकी घेतली. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून रात्री ११ च्या सुमारास जात असताना दोन अनोळखी इसमांनी हात दाखवून थांबविले आणि संत्रा मंडीपर्यंत सोडून देण्यास सांगितले. त्याने दोघांनाही मागे बसवून घेतले.
जयस्तंभ चौक मार्गे चांदूर बाजार रोडने रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे काही अंतरावर दोघांपैकी एकाने अतुलला धक्का दिला. गाडी थांबवताच त्यांनी अतुलच्या गळ्यातील दुपट्टा काढून त्याचे हातपाय बांधले आणि खिशातील ७०० रुपये, आठ हजारांचा मोबाईल आणि दुचाकी असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदविला.