अचलपूर पोलिसांच्या डोळ्यांदेखत गस्तीवरील ‘पिवळ्या हत्ती’वरून चोर निघाले सोने लुटायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:00 AM2021-12-24T05:00:00+5:302021-12-24T05:00:49+5:30
अचलपूर शहरातील देवडी परिसरातील सराफा ओळीतील प्रकाश चेडे ज्वेलर्समधील सोने-चांदी लुटण्याकरिता २० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, दीड वाजतादरम्यान तीन अज्ञात दरोडेखोर मालवाहू गाडीतून पोहोचले होते. या वाहनाला सर्वत्र छोटा हत्ती संबोधले जाते. पोलीस जागे असताना हा हत्ती चावल मंडी मार्गे अचलपूर शहरात दाखल झाला. त्यादरम्यान मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस करीत होते. पण, चोरट्यांचे हे वाहन रिकामे होते. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ते पुढे निघाले.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पोलीस जागे असताना ‘पिवळ्या हत्ती’वरून अचलपूरमध्ये सोने लुटायला तीन चोर दाखल झाले होते. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, दरोड्याच्या अयशस्वी प्रयत्नामागील एक बाजू हीदेखील आहे.
अचलपूर शहरातील देवडी परिसरातील सराफा ओळीतील प्रकाश चेडे ज्वेलर्समधील सोने-चांदी लुटण्याकरिता २० डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, दीड वाजतादरम्यान तीन अज्ञात दरोडेखोर मालवाहू गाडीतून पोहोचले होते. या वाहनाला सर्वत्र छोटा हत्ती संबोधले जाते. पोलीस जागे असताना हा हत्ती चावल मंडी मार्गे अचलपूर शहरात दाखल झाला. त्यादरम्यान मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलीस करीत होते. पण, चोरट्यांचे हे वाहन रिकामे होते. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ते पुढे निघाले. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये कैद झाला आहे.
घटना माहीत होताच सतर्क झालेले पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. गस्तीवरील पोलिसांचे वाहनही त्या ठिकाणी पोहोचले. पण, चोरटे घटनास्थळावरून आपला पिवळा हत्ती घेऊन पसार झाले. ते यशस्वी झाले असते, तर राज्यातील हा सर्वात मोठा दरोडा ठरला असता, अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे. हे तीनही दरोडेखोर गॅस कटर, गॅस सिलिंडरसह पूर्ण तयारीनिशी पोहोचले होते. अशा तयारीसह दाखल होणारे ते पहिलेच चोरटे ठरले. वेळ न दवडता पोलिसांनी तो हत्ती पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती ते वाहन लागले नाही.
सोन-चांदी लुटायला अचलपुरात दाखल झालेल्या दरोडेखोरांची पाठमोरी आकृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यांचा चेहरा यात स्पष्ट होत नाही. दरम्यान अचलपुर पोलिसांनी एकूण पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तरी त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे करीत आहे. हे दरोडेखोर विदर्भाबाहेरील असल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांचा सुगावा लागला असून लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.