तिसरा दिवसही रांगांचाच !
By Admin | Published: November 13, 2016 12:05 AM2016-11-13T00:05:18+5:302016-11-13T00:05:18+5:30
एटीएमचे शटर अर्ध्यावर : शनिवारी ३०० कोटींची उलाढाल, पाचशे-हजाराच्या नोटा बदलविण्याची लगबग
अमरावती : पाचशे आणि हजार रुपयांचे चलन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी बँक आणि एटीएमबाहेर रांगा दिसून आल्यात. रोजच्या व्यवहारात निर्माण झालेल्या अडचणी आणि अनामिक भीती अशा मानसिकतेत बहुतांश नागरिकांनी शनिवारी सकाळपासूनच पाचशे व हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये धाव घेतली. परिणामी शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर बँका बाहेर दिवसभर लांबच लांब रांग राहिली. नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. शनिवारी जिल्ह्यातील बँक व पोस्ट आॅफिसमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सुत्रांनी दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द ठरविण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी देशभरातील बँका बंद राहिल्या. बुधवारी सारे आर्थिक व्यवहार कोलमडले. सर्वदूर ‘पैसा झाला खोटा’ अशी प्रचिती आली. पेट्रोल असो वा सराफा पाचशे-हजारांच्या नोटा चालवण्यासाठी गर्दी झाली. साध्या जेवणासाठीही लोकांना पाचशेची चिल्लर घेण्यासाठी मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. गुरुवारी बँका उघडल्या खऱ्या मात्र उत्सुकतेपोटी रांगाच रांगा लागल्या. इतक्या की पोलिसांना पाचारण करावे लागले. जिल्हा आणि बँक प्रशासनाला शांततेचे आवाहन करावे लागले. शुक्रवारचा तिसरा दिवसही चलनकल्लोळ माजला. शनिवारी बँका नेहमीप्रमाणे बंद राहणाऱ्या होत्या. मात्र बुधवारची सुटी घेतल्याने शनिवारी बँकांचे कामकाज नियमित करण्यात आले. प्रारंभीच्या दोन-तीन तासांमध्ये बहुतेकांना कमाल चार हजारांपर्यंत पैसे बदलून मिळाले. सुरुवातीचे काही ग्राहक दोन हजारांच्या नव्या करकरीत नोटा मिळाल्याने सुदैवी ठरले. शनिवारीही ग्राहकांनी बँकाबाहेर पहाटे सहापासून रांग लावली. (प्रतिनिधी)
संभ्रम कायम
नोट बदलून कशा मिळणार, किती मिळणार, कमाल किती रक्कम मिळणार, बँकेत खाते हवेच, पैसे किती जमा करता येईल, विड्रॉल करता येईल का? ५००-१००० नोटा बदलायच्या नाहीत. मात्र विड्रॉल करून १०० किंवा ५० च्या नोटा हव्या आहेत, असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले होते. त्याचे निरसन करता बँक अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.