तृतीयपंथीयांची पोलीस ठाण्यात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:54 PM2018-07-08T22:54:29+5:302018-07-08T22:55:07+5:30
वहिदा नामक महिलेच्या जाचाला कंटाळून मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी बडनेरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी धडक दिली. याप्रकरणी परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. याचवेळी परिसरातील महिलांनीही ठाण्यात धडक देत तृतीयपंथीयांना आवर घालण्याची मागणी ठाणेदारांना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : वहिदा नामक महिलेच्या जाचाला कंटाळून मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी बडनेरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी धडक दिली. याप्रकरणी परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. याचवेळी परिसरातील महिलांनीही ठाण्यात धडक देत तृतीयपंथीयांना आवर घालण्याची मागणी ठाणेदारांना केली.
आम्रपाली निलू जोगी (३०, रा. निंभोरा वीटभट्टी) याच्या नेतृत्वात ५० तृतीयपंथीयांच्या जमावाने सकाळी ११ च्या सुमारास बडनेरा पोलीस ठाण्यात नवी वस्तीत राहणाऱ्या वहिदा नामक महिलेविरोधात तक्रार दाखल केली. तृतीयपंथीयांचा ग्रुप चालविणारी वहिदा आम्हाला नानाप्रकारे त्रास देते. आमच्या कामकाजात ढवळाढवळ करते. मारण्याची धमकी देते. त्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे, असे तक्रारीत नमूद आहे. दुसरीकडे वहिदानेदेखील तृतीयपंथीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
बडनेराचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांनी वाद चिघळू नये, यासाठी दोन्ही बाजूंना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर परस्परांच्या तक्रारींवरून भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.
दरम्यान, रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांची वेषभूषा करून भलतेच लोक प्रवाशांना वेठीस धरतात. बडनेऱ्यातही अशा बनावट तृतीयपंथीयांचा बऱ्यापैकी भरणा आहे. त्यांच्यामुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. आमच्या व्यथा शासनाने समजून घ्याव्यात, अशी बाजू तृतीयपंथीयांनी पोलिसांपुढे मांडली.
परिसरातील महिलाही धडकल्या ठाण्यात
तृतीयपंथीय पोलीस ठाण्यातून परतल्यानंतर पाचबंगला परिसरातील महिलांनी पोलीस ठाणे गाठले. पाचबंगला परिसरात बरेच तृतीयपंथीय वास्तव्यास आहेत, शिवाय वहिदाचे या परिसरातदेखील घर आहे. तृतीयपंथीयांची सारखी भांडणे होत असतात. त्यामुळे माहोल बिघडला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी देऊनही कारवाई झाली नाही, असे महिलांनी ठाणेदारांना सांगितले. या तृतीयपंथीयांना पाचबंगला परिसरातून काढा, अशी मागणी त्यांनी केली.