बोर नदीत तिसरा बळी; औरंगपुरा येथील युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:27+5:302021-07-28T04:13:27+5:30
फोटो पी २७ बोर नदी नांदगाव पेठ : गतवर्षी पूर्णत्वास आलेल्या बोर नदी प्रकल्पामध्ये सोमवारी सायंकाळी औरंगपुरा येथील १९ ...
फोटो पी २७ बोर नदी
नांदगाव पेठ : गतवर्षी पूर्णत्वास आलेल्या बोर नदी प्रकल्पामध्ये सोमवारी सायंकाळी औरंगपुरा येथील १९ वर्षीय युवकाचा बुडून करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भारत चव्हाण असे त्या युवकाचे नाव असून, मित्रांसमवेत तो या ठिकाणी फिरायला आला होता. मात्र, पोहण्याचा मोह न आवरल्याने त्याने पाण्यात उडी घेतली आणि जीव गमावून बसला. बोर नदी प्रकल्पातील वर्षभरातील ही तिसरी घटना आहे.
भारत चव्हाण आपल्या मित्रांसह सोमवारी सायंकाळी याठिकाणी आला होता. पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि सर्वांनीच पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, भारत पाण्याबाहेर आलाच नाही. मित्रांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आपत्ती व्यवस्थापनाला कळविले आणि एका तासानंतर आपत्ती व्यवस्थापनमधील कर्मचारी दीपक डोरस, दीपक पाल, उदय मोरे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, गौरव जगताप, राजेंद्र शहाकार, प्रफुल भुसारी, दीपक चिलोरकर, गजानन मुंडे, शंकर मुधोळकर आदींनी अथक परिश्रमाने भारतचे शव बाहेर काढले. यावेळी एकच खळबळ उडाली होती.
पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून वाळकी रोडवर बोर नदी प्रकल्प पूर्ण केला. दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढतच आहे. यापूर्वी दोन युवकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला. पोलिसांनी तसेच स्थानिक नागरिकांनी विभागाला सुरक्षा करण्याची मागणी केली. परंतु, विभागाने आजवर या ठिकाणी येऊनसुद्धा बघितले नाही, हे विशेष!
बॉक्स
आणखी किती बळी घेणार प्रकल्प?
वर्षभरात या प्रकल्पामध्ये तीन युवकांनी आपले प्राण गमावले. दररोज या ठिकाणी प्रेमीयुगुल आणि पर्यटक फिरण्यासाठी येतात. परंतु, या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही सुविधा नाही, शिवाय सुरक्षा रक्षकसुद्धा नाही. त्यामुळे तरुण-तरुणी चक्क फोटो सेशनसाठी पाण्यात उतरतात आणि जीव गमावून बसण्याची त्यांच्यावर वेळ येऊन ठेपते. विभागाने या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा हा प्रकल्प आणखी बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.