पावसाळ्याच्या दिवसात ११ गावांची तहान टँकरवर टंचाई कायम
By जितेंद्र दखने | Published: July 6, 2023 06:55 PM2023-07-06T18:55:57+5:302023-07-06T18:56:11+5:30
: ७८ गावांमध्ये ८६ विहिरींचे अधिग्रहण
अमरावती : यावर्षी जून संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही सार्वत्रिक चांगला पाऊस बरसलेला नाही. परिणामी पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ढगही कायम आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ११ गावांत पावसाळ्याच्या दिवसात टँकरद्वारेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
याशिवाय ७८ गावांतही पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने या ठिकाणी ८६ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. त्यामुळे टंचाईची मुदत संपत असताना पुरेसा पाऊस न झाल्याने टॅंकर आणि विहीर अधिग्रहणाला वाढीव कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वाढीव निधी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ७६६ गावांत पाणी पुरवठ्याच्या विविध ८०० उपाययोजनांचे नियोजन करून एकूण १२.४४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. टंचाई आराखडयानुसार उपाययोजना केल्या. मात्र, आता टंचाईचा कालावधी संपुष्टात आला असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे ढग तूर्तास कायम आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांची तहान टॅंकर व विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून भागविली जात आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अजून किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या गावात होतोय टॅंकरने पाणी पुरवठा
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरामधील आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार या गावांचा समावेश आहे.
पाणीटंचाई आराखडयाची मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही गावांत अजूनही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. मात्र, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतीनंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.
- संदीप देशमुख कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,
जिल्हा परिषद