शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:26 PM2023-01-03T14:26:10+5:302023-01-03T14:30:37+5:30
धानोरानजीक विनाक्रमांकाच्या वाहनाने ओव्हरटेक, किराणा मालाच्या वसुलीची होती रक्कम
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : यवतमाळ येथून किराणा मालाच्या वसुलीची रक्कम घेऊन येणारे चारचाकी वाहन अडवून त्यातील तब्बल साडेतेरा लाखांची रोकड लुटण्यात आली. चालकाला शस्त्राचा धाक दाखवत अज्ञात लुटारूंनी धानोरानजीक रविवारी रात्री साडेदहानंतर ही वाटमारी केली.
पोलिस सूत्रांनुसार, बडनेरा येथील लकडगंजमधील इम्रान बेग गफ्फार बेग (३८) हा मालवाहू चारचाकीने अमरावतीकडे येत होता. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारने नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव मार्गाने त्याच्या वाहनाचा पाठलाग केला आणि गाठल्यानंतर कार आडवी लावली. त्यामधून उतरलेल्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी तलवार व चाकूचा धाक दाखवत डिक्कीत ठेवलेली ही रक्कम चालकाकडून हिसकावून घेतली.
अमरावतीच्या व्यावसायिकाची रक्कम
अमरावती येथील ड्रायफ्रूट व्यावसायिकाच्या किराणा मालाची ही रक्कम असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी चालक इम्रान बेग याच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पोळकर पुढील तपास करीत आहेत.