यंदा २८ हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एन्ट्री
By जितेंद्र दखने | Published: May 19, 2024 12:00 AM2024-05-19T00:00:45+5:302024-05-19T00:00:55+5:30
शाळा पूर्व तयारी अभियान : इयत्ता पहिल्या वर्गासाठी प्रवेश पक्रिया
अमरावती : जिल्ह्यात यंदा तब्बल ३९ हजार मुले पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती गुणवत्ता, वाढत्या भौतिक सुविधा पाहता पालकांचेही पाय पुन्हा मराठी शाळांकडे वळत आहेत. त्यामुळेच यावर्षी २८ हजारांवर मुले ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यांदा एन्ट्री करणार आहेत.
खासगी इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळाही भौतिक सुविधा, उपलब्ध होत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १४ तालुक्यांत शाळापूर्व तयारी अभियान जिल्हाभरात राबविले जात आहे. शाळांमध्ये गुणवत्तेसोबतच मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकेही दिली जात असल्याने पालकांचाही ओढा झेडपी शाळांकडे वाढताना दिसत आहे. अशातच शासनाने गत दोन वर्षांत जिल्हाभरातील शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या, खोल्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी दिला आहे.
आता नवीन वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. याशिवाय अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, भौतिक सुविधांची भर, नवीन वर्गखोल्या, शाळा दुरुस्ती, भौतिक सुविधाही उपलब्ध आहेत. मोफत गणवेश, बूट, मोजे, मोफत पाठ्यपुस्तकांमुळे खर्चही वाचतो, डिजिटल शाळांमुळे पालकांसह नवागतांनाही आकर्षण असून, त्यामुळेच झेडपीच्या शाळेतही पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा कल वाढत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आजघडीला २८ हजार ४३१ विद्यार्थी नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी झेडपी शाळेत पहिल्यांदा एन्ट्री करणार आहेत.
१ जुलैपासून नवीन शैक्षणिक सत्र
जि.प.शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र २०२४-२५ येत्या १ जुलैपासून सुरू हाेणार आहे. नवीन शैक्षणिक सत्राच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने पूर्वनियोजनाची तयारी सुरू आहे.
यंदा इयत्ता पहिलीमध्ये अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेत असलेल्या २८ हजार बालकांचे प्रवेश होणार आहे. शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी अभियान राबविले जात आहेत.
- बुद्धभूषण सोनवने,
शिक्षणाधिकारी प्राथमिक
तालुकानिहाय प्रथम शाळेत जाणारे विद्यार्थी संख्या
तालुका मुले मुली एकूण
अमरावती १२९० १०९६ २३८६
भातकुली ५८१ ५४३ ११२४
अचलपूर १८५१ १७३२ ३५८३
दर्यापूर ९७४ ९२२ १८९६
मोर्शी ९४७ ९२४ १८७१
वरूड १२५६ १२६३ २५१९
नांदगाव ६४८ ६२६ १२७४
तिवसा ६०२ ५३१ ११३३
चांदूर बा. १२५६ १२१९ २४७५
धामणगाव ७२० ६९६ १४१६
अंजनगाव ९८७ ८६८ १८५५
चांदूर रेल्वे ५१२ ४३९ ९५१
धारणी १८४४ १७९७ ३६४१
चिखलदरा ११३४ ११७३ २३०७
एक़ूण १४६०२ १३८२९ २८४३१