यंदा खरिपात कपाशीची क्षेत्र वाढणार तर सोयाबीनचे पीक माघारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:42 IST2025-04-22T11:41:43+5:302025-04-22T11:42:53+5:30
Amravati : सलग नापिकी; सरासरी उत्पन्न कमी आल्याचा बसणार फटका

This year, cotton acreage will increase in Kharif season, while soybean crop will decline.
प्रभाकर भगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असताना उत्पन्नात मात्र कमी आलेली आहे. याचा फटका यावर्षीच्या क्षेत्रावर होणार आहे. यामध्ये खरिपात सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार असून, कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन होत असल्याची माहिती आहे.
गत तीन वर्षाच्या पीक पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाच्या संभाव्य पेरणी क्षेत्राचा अंदाज लावला जातो. प्रत्यक्षात मृग महिन्यात म्हणजेच जून महिन्यात होणाऱ्या पावसावर पेरणीचे क्षेत्र निर्भर असते. वेळेवर पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी व तुरीच्या क्षेत्रात वाढ होते. मात्र, पावसाने खंड दिल्यास किंवा पाऊस विलंबाने आल्यास व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या झाल्यास सोयाबीनचे गणित बिघडते व क्षेत्र कमी होऊन कपाशीमध्ये रुपांतरित होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
दोन वर्षे पाऊस चांगला राहिल्याने सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टर पार झाले. मात्र, नंतर पावसामुळे व काढणीच्या काळातही पाऊस झाल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. त्यामुळे मागणी वाढून सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात वर्षभरात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजाराने कमी राहिले आहेत. त्याचा फटका यंदाच्या पेरणी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.
यंदा २.६८ लाख हेक्टर प्रस्तावित
यंदा सोयाबीनचे २,६८,८०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १५ ते २० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे व हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता असल्याने यंदा सोयाबीन पेक्षा कपाशीचे क्षेत्र किमान १५ ते २० हजार हेक्टरने जास्त राहण्याची शक्यता आहे.
"खरिपामध्ये शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिकांकडे राहिला आहे. त्यामुळे सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र जास्त राहील. सोयाबीनला वर्षभर दर न मिळाल्याने गतवर्षीपेक्षा कपाशी व तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे."
- अनिल ठाकरे, कृषी अभ्यासक