अमरावती : यंदाही जीव मुठीत घेऊनच विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार शिक्षणाचे धडे
By जितेंद्र दखने | Published: May 24, 2023 06:48 PM2023-05-24T18:48:46+5:302023-05-24T18:49:19+5:30
जिल्हाभरात १८७ शाळांतील ३३२ वर्गखोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्ताव
अमरावती : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात तोंडावर आली असताना निधीअभावी नवीन शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्येदेखील शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखन व नवीन बांधकाम झाले नसल्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिक्षणाचे धडे घ्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या १८७ शाळांमधील ३३२ वर्गखोल्या धोकादायक असून, या वर्गखोल्यांपैकी ७१ वर्गखोल्यांचा अपवाद सोडला, तर २६१ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून बांधकाम अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.
खासगी शाळेचे लाेण वाढले असले तरी ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत फारसे पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व विशेषत: मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिक अजूनही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचाच आधार आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी त्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे पूर्ण भरलेली आणि ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे त्या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त व कमी असा विरोधाभास पाहावयास मिळतो.
यासोबतच ग्रामीण भागातील शाळांची अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १८७ शाळांतील ३३२ खोल्या धोकादायक बनल्या आहेत. तसा अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक वर्षातदेखील धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे.
तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्या
अचलपूर २६, अमरावती २०, अंजनगाव सुर्जी ३४, भातकुली १०, चांदूर बाजार २६, चिखलदरा ११, चांदूर रेल्वे १२, दर्यापूर ४६, धारणी ४१, धामणगाव रेल्वे १४, मोर्शी १५, नांदगाव खंडेश्वर २८, तिवसा ०३, वरूड ४६ एकूण ३३२
बांधकामकडून ७१ वर्गखोल्यांचे निर्लेखन
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केलेले आहेत. ३३२ वर्गखोल्यांपैकी ७१ खोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाकडून पूर्वपरवानगी मिळाली आहे. याशिवाय ११६ परवानगी अद्याप मिळालेली नाही.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिकस्त वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे निर्लेखनाच्या परवानगीसाठी पाठविले आहेत. या प्रक्रियेसोबतच नवीन बांधकामाकरिता शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. निकडीने कामे प्राधान्याने घेतली आहेत. याशिवाय इतर वर्गखोल्यांची कामे करण्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार सुरू असून, निधी उपलब्ध होताच ही कामे केली जातील.
प्रिया देशमुख,
शिक्षणाधिकारी प्राथमिक