‘त्या’ १० कर्मचाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद पोलीस आयुक्त : टिप प्रकरणाशी संबंध नाही
By admin | Published: December 31, 2015 12:19 AM2015-12-31T00:19:10+5:302015-12-31T00:19:10+5:30
शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या ‘त्या’ १० कर्मचाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद असण्याबरोबरच त्यांची कामगिरी असमाधानकारक होती.
अमरावती : शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या ‘त्या’ १० कर्मचाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद असण्याबरोबरच त्यांची कामगिरी असमाधानकारक होती. त्यामुळेच त्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
मंगळवारी पोलीस आयुक्तांनी धडक कारवाई करीत गुन्हे शाखेतील १० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न केले. टीप प्रकरणाशी संबंध असलेल्या काहींचा त्यात समावेश असल्याने त्या प्रकरणातच पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला, अशी चर्चा पोलीस वर्तुळात त्यानंतर रंगली. मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या संलग्नतेचा टिप प्रकरणाशी संबंध नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. व त्यासोबतच गुन्हे शाखेतील विशिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कथीत समावेश असलेल्या ट्रक टिप प्रकरणाची चौकशी सुरुच असल्याचे ते म्हणाले.
१० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न करुन पोलीस आयुक्तांनी स्वच्छता मोहिमेला आरंभ केल्याची प्रतिक्रिया पोलीस वर्तुळात व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)