मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात ‘त्या’ चौघी अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:16+5:302021-06-20T04:10:16+5:30
१९एएमपीएच०१ - कोलकास स्थित सिपना नदीतील हत्तीडोहात हत्तीणी डुंबतात. १९एएमपीएच०२ - कोलकास येथे हत्तीणींसाठी आहार तयार केला जातो व ...
१९एएमपीएच०१ - कोलकास स्थित सिपना नदीतील हत्तीडोहात हत्तीणी डुंबतात.
१९एएमपीएच०२ - कोलकास येथे हत्तीणींसाठी आहार तयार केला जातो व त्यांना दिला जातो.
------------------------------------------------------------------------------
नाष्टा, जेवण, सिपनात आंघोळ आणि जंगलात रात्र
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : कोरोनाकाळात सर्वांचीच दिनचर्या बदलली आहे, त्यात जंगलातील प्राण्यांचासुद्धा समावेश करावा लागेल. पर्यटनस्थळ सुरू झाले असले तरी देशातील अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पांची दारे पर्यटनासाठी बंद आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दिमतीला असलेल्या चौघी हत्तीणींची मात्र नाष्टा, जेवण, आराम, सिपना नदीत आंघोळ आणि मौजमस्ती सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रादेशिक वनविभागातील जंगलात पडलेले लाकूड गोळा करण्यासाठी वनविभागाच्या दिमतीला असलेल्या जयश्री, चंपाकली, सुंदरमाला व लक्ष्मी या चार हत्तीणी २२ फेब्रुवारी २०१७ पासून पर्यटकांना जंगल सफारीचेसुद्धा काम करीत आहेत. या चौघींनी हजारो पर्यटकांना मेळघाटचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या कोलकास व परिसराचा फेरफटका, मेळघाटची अमृतवाहिनी सिपना नदीचे पात्र फिरवून आणले. त्यातून व्याघ्र प्रकल्पाला लाखो रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले. परंतु, कोरोनामुळे हत्ती सफारी,जंगल सफारी बंद आहे. त्यातून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे हे उपक्रम सुरू करण्याची मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.
बॉक्स
रोज ४० किलो आट्याच्या पोळ्या, गूळ अन् तेल
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात चार हत्तीणी असून, ७५ वर्षांची जयश्री सेवानिवृत्त झाली आहे. चंपाकली ५३, सुंदरमला ५४, लक्ष्मी ४५ वर्षे वयाच्या असून, सकाळी ९ वाजता जंगलातून शोधून आणल्यावर एक किलो आट्याची एक पोळी, गूळ आणि तेल असा नाष्टा केला जातो. सफारी बंद असल्याने पुन्हा जंगलात सोडले जाते. दुपारी अडीच वाजता सिपना नदीपात्रातील राखी डोहात आंघोळ घातली जाते. सायंकाळी ५ वाजता प्रत्येकीला दहा पोळ्या, एक किलो गूळ व तेल असे जेवण दिले की, चराईसाठी जंगलात सोडले जाते. मग रात्र चौघीही जंगलातच काढतात. पुन्हा पहाटे महावत रघुनाथ पंडोले त्यांना घेऊन येतात.
बॉक्स
दिमतीला अधिकारी व कर्मचारी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सिपना वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोह परिक्षेत्रात कोलकास परिसर येतो. या चारही हत्तीणींच्या दिमतीला वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम, वनपाल परमानंद अलोकार, महावत रघुनाथ पंडोले, दोघे चाराकापी व इतर सहा मजूर आहेत.
बॉक्स
दोनदा तपासणी, गवत, कोवळे बांबू खाद्य
जंगलात मनसोक्त वैरण करीत असले तरी चौघीही कोवळे बांबू, गवत, धारीचा पाला खातात. १५ दिवसांतून एकदा, तर महिन्यातून दोनदा त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरसुद्धा आहेत.
बॉक्स
एकीला हवे ४० लिटर पाणी
चौघींच्या खानपान, आरोग्यासोबतच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पिली जंगल, कुंड परिसर, जाडपाट, तीन आम या जंगलात या हत्तीणी फिरतात. एकीला एका वेळेला किमान ४० लिटर प्यायला पाणी लागते. उन्हाळ्यात दोनदा त्या पाणी येत असल्याचे महावत रघुनाथ पंडोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले