‘त्या’ दुधाची आरोग्यास बाधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:05 AM2017-10-07T00:05:28+5:302017-10-07T00:05:39+5:30
कोजागिरीच्या पावन पर्वावर दुधातून बेबंद नफा मिळविण्याचा गोरखधंदा करणाºया शिवा गृहउद्योगातून जप्त केलेले दुध नागरिकांच्या खाण्यात गेले ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोजागिरीच्या पावन पर्वावर दुधातून बेबंद नफा मिळविण्याचा गोरखधंदा करणाºया शिवा गृहउद्योगातून जप्त केलेले दुध नागरिकांच्या खाण्यात गेले असते तर नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचली असती, अशी माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विक्रीपूर्वीच २ हजार लीटर दुधाचा तो साठा जप्त करण्यात आल्याने संभाव्य धोका टळल्याची माहितीही त्यांनी दिली.
शुक्रवारी सातुर्णास्थित ‘शिवा उद्योग’ मधून जप्त करण्यात आलेल्या दुधाचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. या उद्योगस्थळी अतिशय घाण जागेत गंज लागलेल्या कंटेनरमध्ये दोन हजार लीटर दुध साठवून ठेवण्यात आले होते. कोजागिरीला वाढलेली दुधाची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुध साठविण्यात आले होते. एफडीएने गुरूवारी सकाळी या ठिकाणी धाड टाकून साठा जप्त केला. अस्वच्छ ठिकाणी दुध साठविण्याचा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून कोजागिरीनिमित्त नफा मिळविण्याच्या उद्देशातून ही साठेबाजी करण्यात आल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. दुधाच्या नमुन्यांचा अहवाल दोन आठवड्याच्या कालावधीत एफडीएला प्राप्त होणार आहे.
घाण जागेत व बर्फ करून ठेवलेल्या दुधाने डायरिया, गॅस्ट्रो तसेच दूधातून विषबाधाही होऊ शकते. त्यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
- राजेश मुंदे,
हद्यरोगतज्ज्ञ, अमरावती.