तरूणीकडील मोबाईल हिसकावून पळणारे पोलिसांच्या जाळयात
By प्रदीप भाकरे | Published: October 15, 2023 03:35 PM2023-10-15T15:35:24+5:302023-10-15T15:35:39+5:30
मोबाईलसह दुचाकी जप्त : खोलापुरी गेट पोलिसांची कारवाई
अमरावती: घराकडे पायदळ जात असलेल्या एका तरूणीचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून त्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी ही कारवाई करण्यात आली.
निलेश दौलतराव सावरकर (३०, आनंदनगर, अमरावती) व सागर प्रकाशराव रणनवरे (३०, रा. महाजनपुरा, दत्तवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. माताखिडकी येथील शिवाणी नामक २३ वर्षीय तरूणी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.५० च्या सुमारास मोबाईलवर बोलत पायदळ महाजनपुरी गेटकडे जात होती. त्यावेळी २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन जण दुचाकीने तिच्याजवळ आले. पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने तिचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावून खरकाडीपुराकडे जाणा-या रस्ताने पळ काढला. याप्रकरणी खोेलापुरी गेट पोलिसांनी त्याचदिवशी जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला. ठाणेदार रमेश ताले यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीने दिली कबुली
दरम्यान रविवारी गुन्हयातील आरोपी हे संभाजी चौक, महाजनपुरा येथे असल्याची माहिती खोलापुरी गेट पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून निलेश सावरकर व सागर रणनवरे यांना ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ठाणेदार रमेश ताले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक प्रदीप होळगे, अंमलदार राम लोखंडे, मंगेश भेलाये, मंगेश हिवराळे यांनी ही कारवाई केली.