पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 12:53 PM2022-09-22T12:53:25+5:302022-09-22T13:12:35+5:30
अमरावती विभागीय मेळाव्यात टोचले कार्यकर्त्यांचे कान
अमरावती : केवळ पदे घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना यापुढे मनसेत स्थान असणार नाही. जो पक्षासाठी काम करेल, झटेल तोच पदावर राहील, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
'विदर्भ मिशन' निमित्ताने चार दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी बुधवारी येथील एका हॉटेलमध्ये मनसेचा अमरावती विभागीय मेळावा घेतला, यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक वाढीसंदर्भात कानमंत्र दिला. यापुढे संघटनात्मक पदावरदेखील काम करणाऱ्यांनाच संधी असेल. कार्यकर्त्यांनी लोकांची कामे, समस्या सोडविण्यास अग्रक्रम द्यावा, असे ते म्हणाले. काही जणांना असे वाटत असेल की मी राज ठाकरेच्या जवळ आहे, मी पदावर कायमस्वरूपी राहू शकतो, हे डोक्यातून काढून टाका. जो काम करेल, पक्ष वाढवेल त्यालाच यापुढे मनसेत महत्त्वाचे स्थान मिळेल, ही बाबदेखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. मेळाव्यात अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते.
यापुढे वर्षभरासाठी नियुक्त्या
मनसेत संघटनात्मक पदे घेणे म्हणजे काही शोभेची वास्तू नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्याला प्राधान्य देताना संघटनात्मक बांधणी करण्यासाठी यापुढे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती या प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरासाठी करण्यात येतील, ही बाब राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. पक्ष बांधणी करा, असा कानमंत्र त्यांना वर्षानुवर्षापासून पदावर चिकटून बसलेल्यांना गर्भित इशारासुद्धा दिला. यावेळी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाचही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक लक्ष्य
येत्या काळात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मनसेचा झेंडा रोवण्याबाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. गाव, खेड्यात शाखा उघडून 'मनसे' नवा विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म बांधणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. जो पक्ष बांधणी करेल त्यालाच मनसेची उमेदवारी मिळेल असेही ते म्हणाले. मंचावर संदीप देशपांडे, राजू उंबरकर, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, विठ्ठल लोखंडकार,अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे आदी मनसेचे नेते उपस्थित होते.
काम, शिस्त, सातत्यातून सत्तेचा मार्ग
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे. म्हणाले, १९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी रा.स्व. संघाची स्थापना केली. यानंतर जनसंघाने राजकीय निवडणूक लढवायला सुरुवात केली. अनके वेळा पक्षाला पडझड सहन करावी ਹੀ लागली. परंतु, संघाचे काम सुरूच राहिले. पुढे जनसंघाचे रूपांतर हे भाजपमध्ये झाले. अपयशाने खचून न जाता काम सुरूच ठेवले. त्यांच्या याच प्रामाणिकपणामुळे आज ते सत्तेत आहेत. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ काम, शिस्त आणि सातत्यातूनच सत्ता मिळेल.