नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:13 AM2021-05-13T04:13:47+5:302021-05-13T04:13:47+5:30
अमरावती : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय ...
अमरावती : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळाबाजार कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.
जिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झालेले आहेत. आरटीपीसीआर, रॅपिड ॲंटिजेन, अँटीबॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत. रुग्णालयांची वेळोवेळी तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापन करण्यात आले आहे. या काळात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजूंना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गरजू रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बॉक्स
प्रत्येकाची समाजाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध करण्याची वेळ
गरजू रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधिलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रूग्णांची लूट करत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.