महात्मा गांधींच्या विचारांचा पिंपळवृक्षाद्वारे प्रसार, 1936 च्या स्मृतींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 07:31 PM2019-10-03T19:31:54+5:302019-10-03T19:33:00+5:30
राज्यात 152 स्मारकांवर एकाच दिवशी वृक्षारोपण : सेवाग्राम आश्रमातील
गणेश वासनिक
अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी कुणालाही अपरिचित नाहीत. तथापि, त्यांच्या विचारांचा प्रसार सर्वदूर होण्याच्या अनिवार इच्छेने वनविभागाने 150 व्या जयंतीचे औचित्य साधून 1936 साली सेवाग्राम आश्रमात त्यांनी लावलेल्या पिंपळवृक्षाची अनेक रोपटी लावली. राज्यात 152 शहीद स्मारकांवर बुधवारी ही रोपे लावण्यात आली आहेत.
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याचे वनविभागाने निश्चित केले होते. त्याअनुषंगाने राष्ट्रपित्याची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 1936 साली त्यांच्याच हस्ते लावल्या गेलेल्या पिंपळवृक्षाच्या बियांची रोपे तयार करून शहीद स्मारकस्थळी लावण्यात आली. सेवाग्राम येथील पिंपळवृक्षाच्या बिया सामाजिक वनीकरण विभागाने गोळा करून वर्षभरात रोपे तयार केली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीदिनी विविध 152 स्मारक परिसरात शहीद कुटुंबांतील सदस्य, जिल्हाधिकारी व वनाधिकाºयांच्या हस्ते पिंपळाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच दिवशी राबविण्यात आला. या पिंपळ वृक्षाचे जतन, संगोपनाची जबाबदारीसुद्धा वनविभागाने निश्चित केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार पिंपळवृक्षाप्रमाणे बहरावे, सर्वदूर जावेत, हा वनविभागाचा हेतू यामागे आहे.
एका शहीद स्मारकस्थळी चार पिंपळ वृक्षाचे जतन
वनविभागाने एका शहीद स्मारक स्थळावर चार पिंपळ रोपे लावली आहेत. या रोपांचे संगोपन, जतन करण्यासाठी नोडल कर्मचारी नियुक्ती केले जाणार आहेत. वनविभागाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राज्यभरात एकाच वेळी राबविण्यात आला. रोपे तयार करण्यासाठी वर्धा येथील सामाजिक वनीकरणाने मोठा वाटा उचलला आहे.
जिल्ह्यात 10 शहीद स्मारकस्थळांची वृक्षारोपणासाठी निवड करण्यात आली. या रोपांचे जतन, संगोपनासाठी नोडल कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. एका शहीद स्मारकावर चार रोपे लावण्यात आली आहेत. - गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती.