अमरावतीत उभारणार एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, विष्णू सावरा यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:50 PM2018-07-08T18:50:42+5:302018-07-08T19:19:03+5:30
आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.
चिखलदरा (अमरावती) : आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.
चिखलदरा येथे आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आले असता ना. सावरा यांनी ही घोषणा केली. यावेळी विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष विजया सोमवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, निवासी नायब तहसीलदार सैफन नदाफ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. सावरा म्हणाले, आदिवासी विकास मंत्रालयाचे बजेट तीन कोटींचे आहे. याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. यापूर्वीही बराच निधी आदिवासीच्या विकासासाठी खर्च झाला. परंतु विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. १९७२ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळाची निर्मिती झाली. तेव्हापासून शिक्षणाप्रती जागृती निर्माण झाली. राज्यात सध्या ४८१ आश्रमशाळा आहेत. तरीही आश्रमशाळा कमी पडत आहेत. मुलांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे आता स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून आश्रमशाळा, वसतिगृहे संचालित केली जातात. आदिवासी विकास विभागाच्या राज्यात १२५ शाळा असून, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी (डीबीटी) हा कायदा आणला. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल आणि त्यातून ते पुस्तक, वह्या, कपडे, साबण खरेदी करतील व त्यांना वेळेवर आवश्यक साहित्य खरेदी करता येईल. आदिवासी मुलांनाही इतर मुलांच्या स्पर्धेत टिकता यावे, यासाठी नामांकित शाळेत प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. पेसा कायदा, वनहक्क कायदा यासह अनेक कायदे तयार करून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी आ. प्रभुदास भिलावेकर म्हणाले, आम्ही वसतिगृहाची मागणी केली आणि ना. सावरा यांनी ती मागणी मान्य केली. हिवरखेड ते धारणी वीज जोडणीसाठी दोन कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी बºयाच योजना आणल्या. नुकताच खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून हनी क्लस्टरच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना हनिच्या पेट्याचे वाटप केल्याचे त्यांनी नमूद केले.