तापी नदीतून हजारो ब्रास रेती, बजरीचे खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:15 PM2018-12-18T23:15:36+5:302018-12-18T23:16:11+5:30

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमारेषा म्हणून ओळख असलेल्या तापी नदीपात्रातून हजारो ब्रास रेती आणि बजरीचा उपसा करण्याचा सपाटा सुरू आहे.

Thousands of brass sand, gravel mining from the Tapi river | तापी नदीतून हजारो ब्रास रेती, बजरीचे खनन

तापी नदीतून हजारो ब्रास रेती, बजरीचे खनन

Next
ठळक मुद्देउदर पोखरले : महाराष्ट्राच्या सीमेतील नदीपात्रातून अवैध उपसा, महसूलची मूकसंमती

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमारेषा म्हणून ओळख असलेल्या तापी नदीपात्रातून हजारो ब्रास रेती आणि बजरीचा उपसा करण्याचा सपाटा सुरू आहे.
तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर वैरागड आणि कुटंगा दरम्यान उत्तरेकडे पूर्व-पश्चिम असे तापी नदीचे पात्र आहे. निर्धोक वाहतुकीसाठी नदीच्या नावघाटावर पूलनिर्मिती करण्यात आली. या पुलाची महाराष्ट्रातील कामे पूर्ण झाली, तर मध्य प्रदेशातील कामे अपूर्ण आहेत. त्या पुलावरून रेतीची चोरटी वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे.
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी रेती व बजरीची गरज आहे. सध्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील घाटांचे लिलाव न झाल्यामुळे कुठेही रेती उपलब्ध नाही. सबब, या पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेने तापी नदीपात्रात जेसीबी लावून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती खनन सुरू आहे.
पात्रात एक किमी परिसरात अवैध उत्खनन दिसून आले. उत्खननामुळे ठिकठिकाणी १० ते १५ फुटांपर्यंत मोठे खड्डे पडले आहेत.
जेसीबी चालकाने काढला पळ
एका जेसीबीद्वारे बजरी व दगडाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे १३ डिसेंबर रोजी सायंकाळी आढळले. चार ट्रॅक्टरद्वारे ती तस्करी होणार होती. अवैध उत्खननाची छायाचित्रे व व्हिडीओ घेतल्याचे लक्षात येताच संबंधिताने जेसीबी झपाट्याने नदीपात्रातून बाहेर काढून मध्य प्रदेशकडे पळ काढला. .
महसूल विभागाशी लागेबांधे
रेतीचा बिनबोभाट उपसा होत असताना, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. रेतीचोरीला अटकाव घालण्याबाबत उपविभागीय अधिकारी आणि तहसील स्तरावरील भरारी पथक अस्तित्वशून्य ठरले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई
महसूल विभागाने बुधवारी रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त केले. त्यांच्याविरुद्ध चोख कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किशोर आखरे यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यानंतर करण्यात आली, हे विशेष.

रेती तस्करी ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदीपात्रात अवैध उत्खनन, जेसीबीचा वापर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिलेत. लवकरच मोठी कारवाई करू.
- दिलीप कर्डिले, उपविभागीय अधिकारी

Web Title: Thousands of brass sand, gravel mining from the Tapi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.