हजारो कोटींची प्रॉपर्टी अशीच जमविली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:23 AM2018-12-11T01:23:40+5:302018-12-11T01:24:20+5:30
‘एखादा छुटपुट माणूस समोर येतो आणि तो सांगतो, याला काही कळत नाही. मी तीस वर्षांच्या करिअरमध्ये अमरावती शहरात राहतो. मला जर कळलं नसतं, तर हजारो कोटींची प्रॉपर्टीच बनविली नसती. केवळ प्रॉपर्टी म्हणूनच नाही, तर सोशल वर्कसुद्धा मोठ्या पद्धतीने करतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘एखादा छुटपुट माणूस समोर येतो आणि तो सांगतो, याला काही कळत नाही. मी तीस वर्षांच्या करिअरमध्ये अमरावती शहरात राहतो. मला जर कळलं नसतं, तर हजारो कोटींची प्रॉपर्टीच बनविली नसती. केवळ प्रॉपर्टी म्हणूनच नाही, तर सोशल वर्कसुद्धा मोठ्या पद्धतीने करतो. हे सर्व अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. अमरावतीचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात समोर चाललो आहे,’ अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांच्यावर वाग्बाण डागले.
अमरावती वळणरस्ता, बडनेरा ते पॉवर हाऊस व रहाटगाव ते कॅम्प शॉर्ट मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पोटे पाटलांनी रविवारी रात्री उशिरा असे अनेक चौकार, षटकार लगावले. त्यांच्या भाषणावर टाळ्याही पडल्या. ‘पालकमंत्री नव्हे बालकमंत्री’ असे भाषणातून वारंवार जाहीरपणे बोलणारे बडनेºयाचे आमदार रवि राणा व पालकमंत्री प्रवीण पोटे हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना पालकमंत्र्यांनी शब्दांच्या या फैरी झाडल्या. शाब्दिक फटकेबाजीने वातावरण उबदार बनविले असले तरी एकूणच कार्यक्रम मात्र अतिशय शांततेत पार पडला.
या प्रसंगी व्यासपीठावर खासदार आनंदराव अडसूळ, अमरावती शहराचे आमदार सुनील देशमुख हेही उपस्थित होते.
-नाही तर मलाच माराल कुदळ
भूमिपूजनासाठी पालकमंत्र्यांनी कुदळ उचलली तोच त्यांच्या मागे उभे असलेले आमदार रवि राणा हे त्यांना पकडत म्हणाले, सांभाळून, मागे मी उभा आहे. नाही तर माराल मलाच कुदळ! आणि उपस्थित नेत्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ उसळला. पालकमंत्रीही खळाळून हसण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळण्यासाठी आलो
मी अमरावती जिल्ह्याच्या भूमिपूजनात सहसा येत नाही. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचा आदेश दिला, तो पाळण्यासाठी मी येथे आलो आहे, असा खुलासा पालकमंत्र्यांनी केला.
कुणाचा प्लॉट डबल विकला नाही
पालकमंत्री फार्मात होते. बुलंद आवाजातील भाषणातून ते म्हणाले, आम्ही सन्मानाने मोठे झालो. अमरावतीची जनता त्याची साक्षीदार आहे. आम्ही कुणाचा प्लॉट डबल विकला नाही. कुणाचे घर डबल विकले नाही.
राणा यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले, आम्हाला कुणाचे काही घेणे-देणे नाही. विकास हा विकासासारखा असला पाहिजे. तो मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलचा असला पाहिजे आणि आपण आपल्या लेव्हलने राहून कोणती गोष्ट बोलली पाहिजे.
गोष्टी हाकलून चालणार नाही, थापा मारून चालणार नाही. भविष्यातील पिढ्यांना लक्षात राहणारा विकास करण्याचे ध्येय बाळगून आम्ही काम करतो आहोत. विकासाच्या मुद्द्यावर कुणी आडवे आले, तर आम्ही खपवून घेणार नाही.
पैसे मागत असेल तर आम्हाला सांगा
हायब्रिड अॅन्युटीचे हे काम आहे. मुख्यमंत्र्यांचे त्यावर लक्ष आहे. कंत्राटदारांची मुद्दामच ओळख करून दिली नाही. कंत्राटदाराचा चेहरा दिसला की, त्यांना पैसे मागणारे उभे होतात. कंत्राटदारांनी कुणालाच पैसे देण्याची गरज नाही. कुणी पैसे मागत असेलच, तर त्यांनी आम्हाला सांगावे. कुणाला छदामही देण्याची गरज नाही.
राज्यभरात अमरावतीचे मॉडेल
अमरावतीच्या विकासात माझे एकट्याचे योगदान नाही. सुनील देशमुखांचे योगदान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही योगदान आहे, असा उल्लेख करून पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री पांदण रस्ते योजना ही अमरावती जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात गेली. पालकमंत्री पांदण रस्ता योजना मी पहिल्यांदा अमरावतीत राबविली. त्यातून १० हजार किमी पांदणरस्ते मोकळे केले गेले, या त्यांच्या यशस्वी प्रकल्पाचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.
राणा म्हणाले, विकासासाठी सर्व एकत्र येऊ या!
अमरावती : या कार्यक्रमात आमदार रवि राणा हे उपस्थिती लगावणार नाहीत, असाच कयास भाजपजनांसह उपस्थित बहुतेकांचा होता. पण, कार्यक्रम सुरू होण्याच्या ऐन पाच मिनिटे अगोदर आमदार राणा पोहोचले. स्थानापन्न झाले. पहिले भाषण त्यांचेच होते. पालकमंत्र्यांच्या घरापुढे बेशरमचे झाड लावून भाजपाच्या आंदोलनाची हवा काढून घेणारे आमदार या मंचावर नेमके काय बोलतात, काय करतात, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होती. आमदार राणा यांनी मात्र सर्वांच्या कयासांना छेद देत शालीन आणि वैचारिक भाषण केले. ते म्हणाले, विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे या विचारांचा मी आहे. अमरावती हे आपले शहर आहे. अमरावतीचे वैभव वाढविण्यासाठी सर्वांनी या पद्धतीने नेहमीच एकत्र यावे. रस्त्याच्या या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी भरपूर निधी दिला. मी जसा पाठपुरावा केला तसाच सुनील देशमुख आणि बसलेल्या अनेक मंडळींनीही पाठपुरावा केला. या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीही अडचण आल्यास बडनेऱ्याचा आमदार या नात्याने ती मी ताकदीने सोडवेन, असा विश्वासही त्यांनी बांधकाम राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बांधकाम खात्याला दिला. कामाला शुभेच्छा देत त्यांनी भाषण अल्पावधीत आटोपते घेतले. शेवटचे भाषण पालकमंत्र्यांनी केले आणि त्यात त्यांनी जबरदस्त फटकेबाजी केली.