शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेचार हजार
By admin | Published: January 13, 2015 10:52 PM2015-01-13T22:52:37+5:302015-01-13T22:52:37+5:30
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या
अमरावती : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या पद्धतीप्रमाणे केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५०० रूपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी ९ हजार तर फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजार ५०० रूपयांची मदत प्रस्तावित केली आहे. अल्प आणि बहू भूधारकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील व अन्य भागात दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पीक आणि फळबागाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने चार हजार कोटी रूपये निधी मागण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. यासाठी ३० पानांचे सविस्तर निवेदन तयार केले होते.
सदर प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठविला असता महसूल व कृषी विभागाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून विभागीय आयुक्त यांच्याकडून त्याबाबतचे अहवाल पाठविण्यात आला होता. सदर प्राप्त अहवालांचे अवलोकन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने सुमारे चार हजार कोटी रूपये केंद्राकडे मागण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार कोरडवाहू अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ४ हजार ५०० रूपये मदत देण्याचा निकष आहे.
अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ९ हजार रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकाराच्या नुकसानग्रस्त भागाचे जेवढे क्षेत्र अमरावतीसह राज्यभरात २ लाख ७७ हजार १७८ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३६२ कोटी २९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच बागायत बहूभुधारकांच्या एकूण ५८,५४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २४८ कोटी ९३ लाख रूपयांची मागणी करण्यात येणार आहेत. बहूवर्षी फळपिके घेणाऱ्या अल्पभुधारकांना प्रति हेक्टरी १२ हजार ३०० रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकारच्या नुकसानग्रस्त भागाचे क्षेत्र ८६.०६४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १९९ कोटी ९० लाख रूपयांची मागणी केली होती. याशिवाय बहुवर्षीय फळपिके घेणाऱ्या बहूभुधारकांच्या एकूण ४४,११७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७४ कोटी ७५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन हजार कोटीचेच पॅकेज तूर्तास जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही तूटपुंजी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)