बहुसदस्यीय प्रभागात ‘तू-तू, मै-मै’ चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 12:09 AM2016-06-05T00:09:09+5:302016-06-05T00:09:09+5:30
पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे.
राजकीय तोटा : श्रेयवादाची लढाई
अमरावती : पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे. एका प्रभागातून दोन महिला आणि दोन पुरुष असे चार नगरसेवक निवडून जातील. मात्र चारही नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने परस्परात तू-तू, मै-मै होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग विकासाची जबाबदारी सांघिक असल्याने यात नागरिकांचे खऱ्या अर्थाने गोची होण्याची भीती जाणकार सूत्रांकडून व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने सर्व महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभागाची अधिसूचना मे च्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्यावर आता साधकबाधक आणि तेवढ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चार पैकी कुणीही जबाबदारी घेणारही नाही आणि पूर्णपणे झटकणार नाही. अशा परिस्थितीत तीस हजारी प्रभागातील समस्या आणि मतदारांचा वाली कोण असेल? यावर चर्वितचर्वण होत आहे. महापालिकेच्या प्रत्येक चेंबरमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर चर्चा झडत असून बड्या पक्षांच्या सदस्यांव्यतिरिक्त बहुतांश जण या चार प्रभाग पद्धतीचे तोटे मोठ्या कसोशीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपाइं पाठोपाठ अन्य अपक्ष व छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या अध्यादेशातील महापालिकेसंदर्भातील तरतुदीला आव्हान देण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन करताना नानाविध फायदे आणि लोकशाही सुदृढ होण्याचा दावा केला जात असताना संभाव्य परिणामही दृष्टीआड करता येणार नाही. महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग होता. त्यावेळी एका प्रभागात निरनिराळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्याने विकास कामावरून वाद उफाळल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे २००७ च्या निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाल्या तर २०१२ मध्ये पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग पद्धती कार्यान्वित झाली. या रचनेमध्ये तर एकाच प्रभागात निवडून आलेल्या एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये फारसे सख्य नसल्याचे दिसून येत आहे. यात नागरिकांची मात्र उगाचच फरफट होत असल्याचे चित्र आहे. चारचा प्रभाग झाल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. आताच्या द्विसदस्यीय प्रभाग प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवक तुलनेत नवख्या नगरसेवकांचा निधी आपल्याच कामांसाठी वळवीत असल्याचे प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. चार सदस्यीय प्रणालीमध्ये त्यात भर पडणार असल्याचे साशंक भीती महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)