दोन कोटी रुपये दे, अन्यथा अमेरिकेच्या जेलमध्ये पाठवेन! एनआरआयला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:56 PM2023-07-28T14:56:30+5:302023-07-28T14:58:44+5:30
पत्नीसह दहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा, आरोपी इंदूर, मुंबई, दिल्लीचे
अमरावती : येथील एका ४३ वर्षीय युवकाला धमकावून तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. न दिल्यास त्याला अमेरिकेच्या जेलमध्ये पाठविण्याची धमकी देण्यात आली. १३ डिसेंबर २००८ ते २६ जुलैपर्यंत ती छळमालिका चालली. याप्रकरणी तक्रारकर्ता सुशील (४३) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह सहा महिला व चार पुरुषांविरुद्ध चोरी, खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये कैलास प्यारेलाल चौधरी, अजय कैलास चौधरी (दोघेही रा. इंदूर), गुरुदयालसिंग (रा. नवी दिल्ली) व दीपक शर्मा (रा. मुंबई) व सहा महिलांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, सुशील हे काही काळ अमेरिकेत वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, चौधरी पितापुत्र व दोन महिलांनी त्यांच्या घरातून १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३ लाख रुपये रोकड लांबविली. त्याबाबत सुशील यांनी पत्नीला हटकले असता आरोपींनी त्यांना धमकावले. पत्नीचे सुशीलसोबतचे वागणे बदलले. पत्नीसह तिच्या नातेवाइकांनी त्यांना पैशासाठी धमकावणे सुरू केले. दरम्यान, पत्नी गुरुदयाल सिंग, दीपक शर्मा व तीन महिलांना भेटायला जायची. त्यामुळे सुशील यांचीदेखील त्यांच्याशी ओळख झाली.
विवाहयोग्य मुलांना फसविण्याचा गोरखधंदा
त्यादरम्यान दीपक शर्मा, गुरुदयाल सिंग व तीन महिला आरोपी पत्नीच्या आधीपासूनच संपर्कात असल्याची माहिती सुशीलला मिळाली. आरोपींनी भारतातून विदेशात गेलेल्या विवाहयोग्य मुलांना फसवून त्यांच्याशी विवाह करून त्यांच्याकडून पैशाची उकळणी केल्याचे समजताच सुशील यांनी पत्नीला त्यांच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणण्याचे सुचविले.
भारतात परतल्यानंतरही धमकीसत्र
मित्रत्व संपुष्टात न आणता आरोपींनी सुशील यांच्या घराचा ताबा घेतला. तथा घराबाहेर निघून जाण्यास बजावले. दोन कोटी रुपयांची मागणी केली. न दिल्यास तुला फसवितो. अमेरिकेच्या जेलात पाठवितो. कंपनीत तुझी बदनामी करतो, अशा धमक्या दिल्या. त्यामुळे सुशील अमेरिकेतील वास्तव्य सोडून भारतात परतले. त्यानंतरही आरोपींना पैशाची मागणी करून खोट्या प्रकरणात फसविण्याचे धमकीसत्र सुरूच ठेवले. त्यामुळे सुशील हे मानसिक दबावात आले. अखेर त्यांनी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट नं. १४ मध्ये दाद मागितली. त्यावर २६ जुलै रोजी नांदगाव पेठ पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला.
न्यायालयीन आदेशानुसार, फिर्यादीची तक्रार नोंदवून घेतली. त्यांच्या पत्नीसह सहा महिला व चार पुरुषांविरुद्ध खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
- प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ