लैंगिक शोषणानंतर ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, विवाहितेशी वारंवार बळजबरी
By प्रदीप भाकरे | Published: October 14, 2023 02:07 PM2023-10-14T14:07:46+5:302023-10-14T14:08:37+5:30
सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी तिने बाळगले मौन
अमरावती : एका विवाहितेला प्रेम जाळात अडकवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तर गाफीलक्षणी काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचे सर्वस्व लुटण्यात आले. ऑगस्ट २०२२ पासून ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी शुभम साहू (रा. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्कार व बदनामीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडितेच्या नातेवाइकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते नेहमी बाहेर गावी जात असतात. मुले शाळेत गेल्यानंतर ती एकटीच घरी राहत होती. अशातच वर्षभरापूर्वी तिची ओळख तिच्या भावाच्या मित्रासोबत झाली. दोघांमध्ये मोबाइल क्रमांकाची आदानप्रदान झाली. संवाद वाढला. ते परस्परांना व्हॉटस् ॲपवर मेसेज करू लागले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये तो पीडितेच्या घरी आला. तिला शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देऊनही त्याने तिच्यावर अत्याचार केला.
संसाराच्या भीतीपोटी
आपली बदनामी हाईल. पतीला माहीत झाले तर तिचा संसार तुटेल, या भीतीपोटी तिने कोणालाही सांगितले नाही. तेव्हापासून आरोपी हा तिला वारंवार शरीर सुखाची मागणी करत राहिला. नकार दिल्यास आपल्यातील संबंध समाजात सांगून बदनामी करेन, अशी धमकी देत होता. आरोपी शुभमने आपले काही फोटो व व्हिडीओ बनविले. ते व्हायरल करण्याची तो धमकी देत असल्याची विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.