लग्न कर नाहीतर पळवून नेईल! नकार दिल्याने तरुणीला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:21 IST2021-11-15T16:02:27+5:302021-11-15T17:21:04+5:30
लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. तथा तिला मारहाण करून विनयभंगही करण्यात आला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

लग्न कर नाहीतर पळवून नेईल! नकार दिल्याने तरुणीला धमकी
अमरावती : तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिला मारहाण करून पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे तर तिचा विनयभंगही करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी सलमानखान उस्मानखान (२५) व राजा (३२, दोन्ही रा. अन्सारनगर, अमरावती) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातलग आहेत. सलमान खान व त्याच्या आईने मुलीस लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तो दारू पीत असल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी सलमान खान व त्याचा जावई तरुणीच्या गावात पोहोचले. जावई घराबाहेर उभा राहिला, तर आरोपी घरात शिरला व त्याने तरुणीला मारहाण मारहाण केली. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत ओरडतच घराबाहेर पळाली. तेव्हा घराबाहेर असलेल्या जावयासह आरोपीने लग्न कर, अन्यथा पळवून नेईल, अशी धमकी दिली.
दरम्यान, पीडितेची आई व भाऊ घरी पोहोचल्याने दोघेही पळून गेले. या घटनेप्रकरणी १३ नोव्हेंबर रोजी पहाटे वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.