चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तेलंगणातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 08:51 PM2019-12-12T20:51:32+5:302019-12-12T20:51:36+5:30
गाडगेनगर ठाण्याच्या पथकाने तेलगंणा राज्यातील पोलिसांच्या मदतीने हैदराबाद येथून मंगळवारी अटक केली.
अमरावती : घरफोडीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेल्या तीन आरोपींना गाडगेनगर ठाण्याच्या पथकाने तेलगंणा राज्यातील पोलिसांच्या मदतीने हैदराबाद येथून मंगळवारी अटक केली. त्यांना पोलीस खाक्या दाखविताच शहरातील एकूण आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
बसवाराज जगदेव मईलार (३३, रा. आंबेडकर चौक लेबर अड्डा रेल्वे स्टेशन जवळ लिंगमपल्ली हैदराबाद), शेख अन्सार शेख कय्युम (३६, रा. फलकनुमा ,अलजुबेल कॉलनी चंद्रानी गुट्टा हैदराबाद), सैय्यद आजम सय्यद अकबर (२६, रा. फलकनुमा छत्री नाका चंद्रानी गुट्टा), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी सध्या पोलीस कठोडीत असून, अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गाडगेनगर ठाण्यात दाखल अपराध क्रमांक १०००/२०१९ कलम ३८० भादंवि गुन्ह्यात सदर आरोपी हवे होते. तेलगंणा पोलिसांना पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी मथुरा डेअरीत झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाठविले होते. त्यात त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींशी ते फुटेज मिळते जुळते आढळले होते. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांचे पथक हैद्राबात येथे रवाना झाले होते. पथकाने आरोपींना अटक केली. आरोपींना पीसीआर दरम्यान पोलीसी खाक्या दाखविला असता, गाडगेनगर हद्दीत पाच गुन्ह्यांची, तर राजापेठ हद्दीतील दोन गुन्ह्यांची गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यासह आठ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत न्यायालयाने पीसीआर दिला असून, आणखी दोन दिवस पीसीआर वाढवून देण्याची विनंती पोलिसांच्यावतीने न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे ठाणेदार ठाकरे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपआयुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार शेखर गेडाम, सुभाष पाटील, सतीश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.
तेलगंणा पोलिसांना मथुरा डेअरीत झालेल्या चोरीतील फुटेज पाठविले होते. ते त्यांनी बघितल्यानंतर सदर आरोपींची ओळख पटली. त्यानंतर पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरावती