ऑनलाईन फसवणुकीतील साडेतीन लाखांची रक्कम मूळ मालकांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:48+5:302021-03-26T04:14:48+5:30
अमरावती : ऑनलाईन फसवणूक झालेल्या फिर्यादींना तीन लाख ४४ हजार ६१३ रुपयांची रक्कम परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ...
अमरावती : ऑनलाईन फसवणूक झालेल्या फिर्यादींना तीन लाख ४४ हजार ६१३ रुपयांची रक्कम परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते ही रक्कम मूळ मालकांना गुरुवारी वितरित करण्यात आली. अविनाश सेवकदास गोंडाणे (५७ रा. प्रमोद कॉलनी)यांना विविध क्रमांकावरून फोन करून गुंतवणुकीचे आमीष दाखविले होते. त्यांची ४ लाख ८६ हजारांनी फसवणूक झाली होती. जयदीप किशोर शाह (३० रा. नमुना) यांनी ओएलएक्सवर बेड विकण्याची जाहिरात टाकली होती. सायबर गुन्हेगाराने बेड विकत घेण्यासंदर्भात त्यांना एक लिंक पाठविली होती. त्यांनी त्यावर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून ५७ हजार ३४१ रुपये काढून घेण्यात आले. अमोल सुरेश मकवाने (३७ रा. पुष्पक कॉलनी) यांना एअरटेल कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून त्यांच्या खात्यातून ४९ हजार ५०० रुपये काढण्यात आले होते. या तिन्ही प्रकरणात सायबर पोलिसांनी तांत्रिक माहितीद्वारे संबंधित बँकेशी संपर्क करून फिर्यादींची रक्कम परत मिळविली. गुरुवारी पोलिसांनी ती रक्कम फिर्यादींना परत केली आहे. यासाठी सायबर सेलच्या पीआय सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे यांच्यासह सायबर सेलच्या टिमची मदत लाभली.