साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा स्कूलबसच्या धडकेत करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:10 PM2018-11-19T23:10:57+5:302018-11-19T23:11:20+5:30

'स्पीच थेरपी'चा क्लास करून रस्ता ओलांडताना स्कूलबसखाली चिरडून साडेतीन वर्षांच्या निरागस, निरपराध चिमुकलीचा करुण अंत झाला.

Three-and-a-half-year-old schoolchildren | साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा स्कूलबसच्या धडकेत करूण अंत

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा स्कूलबसच्या धडकेत करूण अंत

Next
ठळक मुद्देआणखी किती बळी जाणार? : सुनील देशमुखांच्या घरानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'स्पीच थेरपी'चा क्लास करून रस्ता ओलांडताना स्कूलबसखाली चिरडून साडेतीन वर्षांच्या निरागस, निरपराध चिमुकलीचा करुण अंत झाला.
ही हृदयदायक घटना अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांच्या रुख्मिणीनगरातील घरासमोरील सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास रस्त्यावर घडली. आमदार देशमुखांचे घर घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. आज्ञा प्रफुल्ल मंडळकर (वय साडेतीन वर्षे, रा. जळका शहापूर) असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, आज्ञा मंडळकर या चिमुकलीला बोलण्यासंबंधीचा त्रास होता. मुंबई येथे चिमुकलीवर शल्यक्रियादेखील करण्यात आली. दीड वर्षांपासून तिला रुख्मिणीनगरातील डॉ. मयुरी कुळकर्णी यांच्या उपचार केंद्रात स्पीच थेरपी दिली जात होती.
२५ किमी अंतरावरील शहापूर येथे राहणारी आज्ञा बसगाडीने आजीसोबत अमरावतीत यायची. आजी, नाती दोघीही दुपारी एसटीबसने अमरावतीत आल्या. बसस्थानकावरून दोघीही पायदळ उपचारकेंद्रात पोहोचल्या. आज्ञावर दुपारी २ ते ३ पर्यंत उपचार करण्यात आले. त्यांची परतीची बसगाडी ५ वाजता असल्यामुळे उपचारवर्ग संपल्यानंतर आजी, नाती तासभर उपचारकेंद्रात थांबल्या. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आजी आज्ञाला घेऊन बाहेर पडल्या. काही अंतर चालतात न चालतात तोच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील स्कूलबस क्रमांक एमएच २७ ए ९७३९ ची धडक आज्ञाला बसली. ती गंभीर जखमी झाली. तिला लाईफ केअर इस्पितळात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान आज्ञाचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर स्कूल मिनीबस चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी स्कूलबसचा क्रमांक नोंदविला. घटनेच्या माहितीवरून राजापेठ ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुल ठाकूर यांनी घटनास्थळी चौकशी करून स्कूलबसचा क्रमांक मिळविला. घटनास्थळाचा पंचनामा करून उपस्थितांचे बयाण नोंदविले. या अपघात प्रकरणात आज्ञाचे वडील प्रफुल्ल मंडळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ अ, २७९, मोटार वाहन अ‍ॅक्ट १३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
सारेच संपले
आईवडिलांना आज्ञा ही एकुलती एक मुलगी. तिच्यासाठी तिचे बाबा राबराब राबून, पै-पै जमवून दर्जेदार आयुष्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत होते. नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये तिचे वडील श्रमिक आहेत. या घटनेनंतर त्यांच्या आयुष्यातील जगण्याचे ध्येयच हरपल्याच्या त्यांच्या भावना होत्या.

रुग्ण मुलगी गॅसपिनवर होती. तिच्या छातीला मार लागला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. कुत्रिम श्वासोश्वास नळीद्वारे दिला. फुफुसाला मार लागल्याने एक्सरे काढले. तिचे उजव्या बाजूची हाडे मोडली. छातीत अधिक रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
- नरेश तायडे, बालरोग तज्ज्ञ,
लाईफ केअर हॉस्पिटल

आज्ञा ही आता बोलायला लागली होती. पाच ते सहा शब्द ती उच्चारत होती. तिच्या शस्त्रक्रियेसाठी ८ लाखांचे डोनेशन गोळा करून मुंबईत शस्त्रक्रिया केली. ती पूर्णपणे बरी होणार होती, मात्र, एका क्षणात वाईट घडले.
- मयुरी कुळकर्णी,
आॅडिओलॉजीस्ट, स्पिच थेरपिस्ट

Web Title: Three-and-a-half-year-old schoolchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.