चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
By प्रदीप भाकरे | Published: July 31, 2023 05:05 PM2023-07-31T17:05:56+5:302023-07-31T17:09:27+5:30
कोतवाली पोलिसांची ताबडतोब कारवाई
अमरावती : पायदळ घरी जात असलेल्या एका १९ वर्षीय चाकूने वार करून त्याच्याजवळील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना शहर कोतवाली पोलिसांनी ३० जुलै रोजी अटक केली. आरोपी तरूणांकडून ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना २८ जुलै रोजी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास पटवा चौक येथे घडली होती. अवघ्या काही तासात कोतवाली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
अटक आरोपींमध्ये राज रोहीत देऊळकर (१९), कृष्णा संतोष श्रीवास (२१) व पीयूष संजू बरोरे (१८ सर्व रा. मसानगंज) यांचा समावेश आहे. २८ जुलै रोजी रात्री मसानगंज येथील रहिवासी नजमुल अयुब मंडल (१९) हा कंपनीतील काम आटोपून सहकाऱ्यांसह पायदळ घरी जात होता. एका सहकाऱ्याचा मोबाइल बघत जात असताना दुचाकीवरून तीन लुटारू नजमुल याच्याजवळ आले. एकाने त्याच्याजवळील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने हाताला झटका देत तेथून पळ काढला. त्यावेळी आरोपींनी पाठलाग करून नजमुलला पटवा चौक येथे पकडले. चाकूने वार करीत आरोपींनी त्याच्याकडील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरातील नागरिक गोळा झाल्याने लुटारूंनी दुचाकीने पळ काढला होता. या प्रकरणी नजमुल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
त्वरेने तपास, आरोपी ट्रॅप
ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वातील टिम कोतवाली तपास करत असताना त्या गुन्ह्यात राज, कृष्णा व पियूष यांचा हाथ असल्याचे समोर आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार विजयकुमार वाकसे, पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंगराव जाधव, मलिक अहेमद, प्रमोद हरणे, आशिष इंगळेकर, पंकज अंभोरे, आनंद जाधव यांनी केली.