रुग्णवाहिकेतच तीन बालकांचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:11+5:302021-07-22T04:10:11+5:30
अंबाडा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर कर्मचारी हजर नसल्याने तथा कर्मचारी वर्गाची रिक्त ...
अंबाडा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर कर्मचारी हजर नसल्याने तथा कर्मचारी वर्गाची रिक्त पदे न भरल्याने गरोदर मातांना तथा नगरिकांना रुग्णसेवा मिळेनाशी झाली आहे. असाच प्रकार १८ जुलै रोजी नवजात बालकांच्या जन्माने उघडकीस आला. ३ नवजात शिशूंचा जन्म रुग्णवाहिकेतच झाल्याचा धक्कदायक प्रकार नुकताच घडला.
अंबाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचरी अमरावती तथा मोर्शीहून ये-जा करतात. येथील उपकेंद्रात कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने सकाळी ८ ते दुपारी ४:०० पर्यंतच कर्मचारी कार्यरत असतात. सुटीच्या दिवसी आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र ओस पडलेले असते.
१८ जुलै रोजी बाजारपुरा येथील सुनीता गणेश राऊत, गणेशपूर येथील नर्मदा धुर्वे, चिंचोली गवळी येथील प्रियांका धुर्वे या गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आशावर्करसह दाखल झाल्यात. पण, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व सेविका गैरहजर असल्याने त्यांना संदर्भ सेवा देऊन आशावर्करने रुग्णवहिकेत प्रसूतीसाठी मोर्शी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेत नेले. परंतु, अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्याने तिनही महिलांची रुग्णावाहिकेत तथा ग्रामीण रुग्णालयाच्या गेटवरच प्रसूती झाली.
आशावर्कर तथा रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. महाराष्ट्र शासना मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. पण, कर्मचारी वर्ग त्या बाबीला तिलांजली देत आहे. जर या तीन प्रसूती दरम्यान अघटीत घडले असते तर याला कोण जबाबदार, असा प्रश्न जनमानसात चर्चिला जात आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे शासनादेश असतानासुद्धा तालुका आरोग्य अधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी हे कर्मचारी वर्गांना अभय का देतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे तथा रिक्त पदे तत्काळ भरावी. नागरिकांना आरोग्य सेवा सुराळीत द्यावी, अशी मागणी होत आहे.
-: प्रतिक्रिया:-
१ कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. पावसाळात आजार वाढतात. आरोग्य सेवा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यावर वरिष्ठांचे नियंत्रण आवश्यक आहे.
- रुपाली रवींद्र कडू, सरपंच, अंबाडा
२ रुग्णवाहिकेत प्रसूती होणे हे लज्जास्पद आहे. मुख्यालयी कर्मचारी राहावेत, याबाबत सर्वांना पत्र दिलेत. आता यापुढे हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करू. तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू.
- डॉ. हेमंत महाजन - प्रभारी वैद्यकीय अधिकारी
३ माझ्या पेशंटची प्रसूती गेटवरच झाली. तत्काळ तिला औषधोपचार दिले. पण, आरोग्यसेविकेच्या उपस्थितीत सुरक्षितरीत्या प्रसूती होणे आवश्वक आहे.
- शोभा देशभ्रतार, आशावर्कर, अंबाडा
210721\img_20210721_131212.jpg
प्राथमिक आरोग्य केंद्र अंबाडा