परतवाड्यात २०० खाटांचे स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:01:06+5:30
दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता मिळाली आहे.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीतील आरोग्य व्यवस्थेचे श्रेणीवर्धन करण्यात आले. परतवाडा शहरात २०० खाटांच्या स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालयासह अचलपूरला स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आमदार बच्चू कडूंच्या प्रयत्नांतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता मिळाली आहे. यात शहरातच डायलिसिसची सोय उपलब्ध होणार आहे. अचलपूरला १२ सप्टेंबर २००३ रोजी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मिळाले. तेथे सुविधांसाठी आमदार नसताना बच्चू कडूंसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णालयासमोर स्वत:ला उलटे टांगून घेतले होते. या रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्यांचाही आ. कडूंनी आरोग्य विभागासह शासनाकडे पाठपुरावा केला. अपघातग्रस्तांकरिता १ कोटी ६१ लाखांचे स्वतंत्र ट्रामा केअर युनिट बच्चू कडू यांनी २०१० मध्ये मंजूर करवून घेतले. ते ट्रामा केअर युनिट आता इमारत व यंत्र सामग्रीसह उभे राहिले आहे. आमदार बच्चू कडू यांनी नवजात शिशूंकरिता स्वतंत्र दक्षता केंद्र अचलपूरला मान्य करून घेतले आहे. या नवजात शिशू दक्षता केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याठिकाणी स्वतंत्र २२ बेड आहेत. वार्मअप बॉक्ससह संपूर्ण दक्षता केंद्र वातानुकूलित आहे.