हल्लेखोरांच्या तीन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:58 PM2018-01-03T23:58:00+5:302018-01-04T00:01:16+5:30
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. मात्र, काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवरही दगडफेक करून व्यापाऱ्यांना मारहाण केली. व्यापाऱ्यांचा रोष त्यामुळे उफाळून आला. व्यापारी एकत्र आले आणि त्या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. युवक पळाले, मात्र त्यांच्या तीन दुचाकी हाती लागल्या. त्या जाळण्यात आल्या. या घटनेने खळबळ उडाली होती.
शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मात्र, बुधवारी सकाळपासून पडसाद उमटू लागले. शहरातील विविध परिसरातून एकत्रित होताना काही युवकांनी दुचाकींवरून शहरातील विविध व्यापारी परिसरात उच्छाद घातला. जोरदार नारेबाजी करीत प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. या दगडफेकीचे सर्वाधिक पडसाद जवाहर गेटच्या आत पाहायला मिळाले. सात ते आठ युवक दुचाकीने जवाहर गेट ते सराफा बाजार मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी गेले. त्यांनी आरडाओरड व नारेबाजी करून थेट व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक सुरू केली. दुग्ध व्यावसायिक पूनमचंद हलवाई यांची दुधाची भट्टी फोडली. वर्मा स्टिल हे प्रतिष्ठान कुलूपबंद न दिसल्याने बाहेर बसलेले दुकानमालक रामू वर्मा यांना मारहाण केली. कैलास शर्मा व गोलू नामक कर्मचाºयालासुद्धा त्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने तर चक्क चाकू बाहेर काढून व्यापाऱ्यांना धाक दाखविला. या दहशतीमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली. दुकाने लुटली जाऊ नयेत, या विचारातून सर्व व्यापारी भीती बाजूला सारून एकत्र आले. त्या युवकांचा जत्था जसजसा समोर येऊ लागला, तसतसे व्यापारीसुद्धा एकत्रित होत गेले. एकीकडे सात ते आठ युवक, तर दुसरीकडे पन्नासेक व्यापारी एकत्र आले आणि त्या युवकांवर धावा बोलला. व्यापारी समोर येत असल्याचे पाहून ते युवक घाबरले. उलटपावली पळून गेले. व्यापाºयांनी प्रयत्न करूनही त्या युवकांना पकडण्यात यश आले नाही. मात्र, तिघांना त्यांच्या दुचाकी सोबत नेता आल्या नाहीत. व्यापाऱ्यांनी सारा रोष दुचाकींवर व्यक्त केला. ठरवून त्या जाळल्या. काही हिंदुत्ववादी संघटना व्यापाºयांच्या मदतीला धावून आल्या. ते युुवक पुन्हा आल्यास सामना करण्याच्या तयारीत सर्वजण होते.
निघाले नाही मोबाइल : दोन दुचाकी गेटच्या समोर आणि एक दुचाकी गेटच्या आत जाळण्यात आली. विशेष असे, ही जाळपोळ करताना कुणीही छायाचित्रण करू नये, अशी विनंती करण्यात आली. भरगच्च गर्दीत एकाही मोबाइलमध्ये दुचाकी कुणी जाळल्या, हे कैद झाले नाही.
जवाहर गेट परिसरात जमावबंदी लागू
हल्लेखोर युवकांच्या ज्या दुचाकी व्यापाऱ्यांनी जाळल्या, त्यांचे क्रमांक असे आहेत - एमएच २७ बीसी-८५५६, एमएच २७-बीजी-१८२७ व एमएच २७ बीए-१८२७. दरम्यान, जवाहरगेट आणि सक्करसाथ परिसरात हिंदुत्ववाद्यांची आणि व्यापाºयांची गर्दी वाढू लागल्याने लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलिसांना वरिष्ठ अधिकाºयांकडून प्राप्त झाले होते. दरम्यान, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी जातीने मोर्चा सांभाळला. जवाहर गेटवर बॅरिगेड्स लावून ते स्वत: उपस्थित होते. त्यांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन घरी जाण्याची विनंती त्यांनी केली. ते युवक पुन्हा गेटच्या आत शिरू देणार नाही, अशी हमी त्यांनी घेतल्यावर हळूहळू जमाव पांगू लागला.