पत्नी, मुलीच्या खुनानंतर तीन दिवस पश्चातापाची धग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:00+5:302021-07-04T04:10:00+5:30

ऑन दि स्पॉट सचिन मानकर/अनंत बोबडे दर्यापूर/ येवदा : वैफल्यग्रस्त होऊन त्याने पत्नी व मुलीचा गळा आवळला. हे आपल्या ...

Three days after the murder of his wife and daughter, a cloud of remorse! | पत्नी, मुलीच्या खुनानंतर तीन दिवस पश्चातापाची धग!

पत्नी, मुलीच्या खुनानंतर तीन दिवस पश्चातापाची धग!

Next

ऑन दि स्पॉट

सचिन मानकर/अनंत बोबडे

दर्यापूर/ येवदा : वैफल्यग्रस्त होऊन त्याने पत्नी व मुलीचा गळा आवळला. हे आपल्या हातून काय घडले, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मात्र, गुन्हा तर घडून चुकला होता. त्याचे क्षालन कसे करायचे, या पश्चातापात त्याने तीन रात्री व दिवस कसेबसे काढले. दुर्गंधी वाढत चालल्याने आता दुहेरी खुनाचा प्रकार उघड होईल. या भीतीपोटी त्याने पत्नी व मुलीच्या मृतदेहांना दडविण्याचा वृथा खटाटोप केला. मात्र, आता जगून तरी काय लाभ, असा टोकाचा विचार करत त्याने स्वत:ला संपविले. तीन दिवस व रात्र त्याने पत्नी व मुलीच्या मृतदेहासोबत काढले.

दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिसांच्या हद्दीतील भामोद येथील या खून व आत्महत्या प्रकरणाने अवघी पंचक्रोशी हादरली आहे. सुसाईड नोटने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. अनिल देशमुखने पत्नी वंदना व मुलगी साक्षी हिला संपविले. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्नदेखील केला. कौटुंबिक कलह, आर्थिक कोंडी, मुलांचे शिक्षण, व्यसन आणि शेतीच्या वादातून अनिल देशमुखने हे आत्मघातकी पाऊल उचलले. येवदा पोलिसांच्या तपासातील प्राथमिक माहितीनुसार, अनिलने मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी मुलगी साक्षी हिला काही कामानिमित्त बाहेर पाठवून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर घरी आलेल्या मुलीचासुद्धा ओढणीने गळा आवळून तिचासुद्धा खून करून मृतदेह दिवाणच्या खाली दडवून ठेवला. सदर कृत्य केल्यानंतर गुरुवारी उशिरा रात्री वा शुक्रवारी सकाळी अनिलनेही घरातील बाजूच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आरोपी तीन दिवस गावातच होता, दारू पीत होता, असे देखील स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय गाठून आमदार बळवंत वानखडे व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी येवदा ठाणेदारांकडून घटना जाणून घेतली.

रेणुका वाचली

मामाच्या गावी गेल्यामुळे सुदैवाने बचावलेली लहान मुलगी रेणुका (१४) ही नववीत शिकत आहे. अनिल देशमुख याने मुलगी रेणुका हिला तिच्या मामाच्या गावी सोहळ ता. कारंजा येथे एका लग्नाच्या निमित्ताने आठ दिवसांपूर्वी नेऊन दिले होते. मृत मुलगी साक्षी ही यावर्षी दहावीत होती. रेणुकाचा सांभाळ मामाने करावा, अशी अंतिम इच्छादेखील अनिलने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली.

कोरोनाकाळात वैफल्यग्रस्त

अनिल हा आई, पत्नी, दोन मुलीसह राहत होता. बाजूलाच त्याची विधवा वहिनी मुलांसह राहत होती. कोरोनाकाळात तो मालवाहू ऑटो चालवून कुटुंबाची गुजराण करायचा. मात्र, लॉकडाऊन २ मध्ये त्याचा रोजगार हिरावला. तो मद्याच्या आहारी गेला आणि कौटुंबिक कलह सुरू झाला.

शेतीचा वाददेखील कारणीभूत

अनिलने स्वत:च्या नावे असलेली शेती यापूर्वीच विकली. त्याच्या आईच्या नावे तीन एकर शेती आहे. शेती आणि घराचा हिस्सा यासाठी त्याचे आई आणि वहिनीसोबत नेहमीच वादविवाद होत होता. या कारणामुळे १५ दिवसांपूर्वी आई आणि वहिनी मुलांना घेऊन गावातील एका घरात भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. वहिनीने त्याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच येवदा पोलिसात तक्रार दाखल केली होती. तो वाददेखील या दुहेरी हत्याकांडाला कारणीभूत आहे.

तिघाही भावांची आत्महत्या

मृत अनिलसह देशमुख कुटुंबात तीन भाऊ होते. त्यातील एका भावाने दहा वर्षांपूर्वी जैनपूर फाट्यावर तर दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी भामोद फाट्यावर गळफास घेऊनच आत्महत्या केली, हे विशेष. आता तिसऱ्या भावानेदेखील फासच जवळ केला.

अत्याधिक दुर्गंधीमुळे कुणी फिरकेना

सुमारे चार दिवसांपूर्वी केव्हातरी अनिल देशमुखने पत्नी व मुलीची हत्या केली. शुक्रवारी तेथे प्रचंड दुर्गंधी सुटली. त्यामुळे शुक्रवारी व शनिवारी देखील त्यांच्या घराकडे आप्ताशिवाय कुणी फिरकले नाही. अद्यापही ती दुर्गंधी नाकाला झोंबत असल्याची प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी व्यक्त केली.

बुलेट पॉईंट

मुलीचा मृतदेह दिवाणखाली

पत्नीचा मृतदेह पोत्यांनी झाकला

वहिणीच्या घरात स्वत: घेतला गळफास

मामाच्या गावी असल्याने धाकटी वाचली

घटनास्थळी प्रचंड दुर्गंधी

दारूच्या व्यसनाधिनतेतून मायलेकीला संपविले

मृत अनिल देशमुखविरूद्ध खुनाचा गुन्हा

बॉक्स

रेणुकाने फोडला टाहो

मामाकडे असलेली रेणुका शनिवारी सकाळी भामोद येथे पोहचली. दुपारच्या सुमारास आई-वडील व बहिणीचा मृतदेह पाहून तिचा टाहो उपस्थितांचेदेखील डोळे पाणावून गेला. तिचे संपूर्ण जगच कोलमडून पडले होते. १४ वर्षांच्या त्या कोवळ्या मुलीसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिची आजी, काकू, चुलत भाऊ, मामा व अन्य आप्त तिला धीर देत होते. मृत अनिलचा पुतण्या नीरज प्रदीप देशमुख याने तीनही मृतदेहांना भडाग्नी दिली.

Web Title: Three days after the murder of his wife and daughter, a cloud of remorse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.