शाळा सुरू होण्याचा मुहूर्त तीन दिवसांवर, गणवेशाचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:03+5:302021-01-24T04:07:03+5:30
अमरावती : प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठीचा मुहूर्त २७ जानेवारी हा शासनाकडून काढण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ...
अमरावती : प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठीचा मुहूर्त २७ जानेवारी हा शासनाकडून काढण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुखांसमवेत बैठकी होत आहेत. परंतु, यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणेशाबद्दल कुठलीही बोलणी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा पत्ताच नाही. विशेष म्हणजे, शैक्षणिक सत्र संपण्यासाठीही दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.
नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेशास पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठीचा निधी उपलब्ध करण्यात आला असून, प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद , नगर परिषद, महापालिकांना मंजूर असलेल्या आर्थिक तरतुदीपैकी जिल्हा आणि महापालिका स्तरावर शिल्लक असलेली अखर्चित रक्कम विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांनी १३ नोव्हेंबरला दिले. या आदेशाला अडीच महिने होत असले तरी अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
बॉक्स
जिल्ह्यात ३ लाख ४५ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी गणवेशासाठी पात्र विद्यार्थी
१,१४,२८१ आहेत. यामध्ये मुली ६६९७१, अनुसूचित जाती मुले १०९१५, अनुसूचित जमाती मुले २००१०, दारिद्रयरेषेखालील गटांतील मुले १६३९४,
कोट
शालेय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश पुरविले जातात. यंदा कोरोनामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. असे असले तरी पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरीता उपलब्ध निधी पंचायत समितीमार्फत शाळांना दिला आहे. शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीकडून याबाबत कार्यवाही सुरू आहे.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)