‘व्हिलेज बॅरिस्टर’वर आयोगाचा तीन दिवस ‘वॉच’
By admin | Published: October 11, 2014 10:58 PM2014-10-11T22:58:21+5:302014-10-11T22:58:21+5:30
जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता गठ्ठा मते असलेल्या गाव पुढाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरूवात केली आहे़ परंतु या भेटीवर थेट निवडणूक
मोहन राऊत - अमरावती
जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता गठ्ठा मते असलेल्या गाव पुढाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरूवात केली आहे़ परंतु या भेटीवर थेट निवडणूक आयोगाने आपला ‘वॉच’ ठेवला आहे़ निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने तीन दिवस-रात्रीला गावात फिरणारे ‘व्हिलेज बॅरिस्टर’ म्हणजे गाव पुढारी यांच्यावर आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे़ या तीन दिवसांत गावात होणाऱ्या पार्ट्यांवर तथा रात्री पैसे वाटपावर नजर ठेवण्याची जबाबदारी गावातील तलाठी व पोलीस पाटलांवर दिली आहे़ पैसे वाटप करताना आढळल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला निवडणूक आयोगाने दिले आहे़
विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात रणधुमाळीला वेग आला असला तरी प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गाठीभेटींवर लक्ष दिले आहे़ कोणत्या गावात कोणत्या समाजाची आपल्याला किती मते मिळणार याची आकडेमोड करायला सुरूवात झाली आहे़ मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मते खरेदी विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सुरू झाल्याची चर्चा आहे़ कोणती मते खरेदी करायची याचा लेखाजोखा ‘व्हिलेज बॅरिस्टर’च्या माध्यमातून उमेदवारांनी घेतला असून मनी पॉवरचा पूर्ण अधिकार या ‘व्हिलेज बॅरिस्टर’ला दिला आहे़ त्यामुळे निवडणूक आयोगाचे याबाबींकडे कटाक्षाने लक्ष आहे़ संबंधित गाव पुढारी हा रात्री कुणाकडे जातो, किती मतदारांची भेट घेतो, संबंधित गाव पुढाऱ्यांसोबत किती मतदार आहेत याची गुप्त माहिती पोलीस पाटील व तलाठ्याला ठेवावी लागणार आहे़ विशेषत: तीन दिवस रात्रीला या दोघांना गस्त घालावी लागणार आहे़ पैसे वाटताना दिसल्यास थेट पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे़