अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 07:12 PM2019-10-30T19:12:13+5:302019-10-30T19:12:29+5:30

पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेणा-या दोन महिलांसह एका इसमाचा वीज कोसळून मृत्यू झाला.

Three death in Amravati district | अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

Next

अमरावती : पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेणा-या दोन महिलांसह एका इसमाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास पूर्णानगर ते मार्की फाटा या मार्गावर घडली. सैयद नुरुद्दीन सैयद बद्रोद्दीन (६५, रा. अंजनगावसुर्जी), सोनाली गजानन बोबडे (३४, बोपापूर, ह.मु. बडनेरा) व शोभा संजय गाठे (४५,रा. विलायतपुरा, अचलपूर) अशी मृतांची नावे आहेत. त्यांना मृतावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते.
 
 अमरावती जिल्ह्यातील काही परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. याच वेळी अंजनगावसुर्जीतील रहिवासी सैयद नुरुद्दीन व त्यांचा मुलगा सैयद मोईद अमरावतीवरून अंजनगाव सुर्जीला दुचाकीने परत निघाले होते. बडनेरातील रहिवासी  स्वप्निल वाठ बहीण सोनाली बोबडे यांना दुचाकीवर घेऊन करजगाव येथे मामाकडे निघाले होते, तर अचलपूर येथील रहिवासी रमेश लक्ष्मण नागले हे बहीण शोभा संजय गाढे (४५) यांना दुचाकीवर घेऊन अमरावतीवरून अचलपूरला जात होते. यादरम्यान अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिन्ही दुचाकीस्वारांनी वलगाव ते आसेगाव पूर्णा मार्गातील पूर्णानगरनजीक रस्त्यालगत दुचाकी लावून झाडाखालीच आसरा घेतला. या सहा जणांसोबत तेथे आणखी दोन व्यक्ती झाडाखाली उभ्या होत्या. 

दरम्यान, अचानक विज कडाडली आणि सैय्यद नुरुद्दीन, सोनाली बोबडे व शोभा गाठे विजेच्या धक्क्याने खाली कोसळले. विजेच्या आवाजाने झाडाखाली उभे असलेले सर्व जण सुन्न झाले होते. त्यांनी खाली कोसळलेल्या आपआपल्या नातेवाइकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बेशुद्धावस्थेत पडून होते. त्यांनी मदतीसाठी रस्त्यावरून जाणा-या वाहनांची मदत मागितली. धारणीवरून अमरावतीकडे येणाºया ‘१०२’ रुग्णवाहिकेचे चालक मनोज बरडे यांनी वाहन थांबविले. त्यानंतर पूर्णानगरचे सरपंच गजेंद्र गहरवाल व सामाजिक कार्यकर्ता प्रवीण खेकडे यांनी सैयद नुरुद्दीन यांना वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिकाद्वारे सोनाली बोबडे व शोभा गाठे यांना रुग्णालयात आणले गेले. येथे मृतकाचे नातेवाईक व नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. या घटनेबद्दल नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगारात ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल कॉल लावताच खेचली गेली वीज
झाडाखाली आठ जण उभे असताना, एका व्यक्तीने मोबाइलवरून कुणाला तरी कॉल केला आणि अचानक वीज त्यांच्याभोवती खेचली गेली. विजेच्या प्रचंड कडकडाटाने झाडाखाली उभे असणा-यांना हादरा बसला. विजेच्या स्पर्शाने तिघे खाली कोसळताच मोबाइल कॉल करणारा तेथून पळून गेला, अशी माहिती जखमी स्वप्निल वाठ यांनी दिली. 

दोन भावांसमोर बहिणींचा मृत्यू
 स्वप्निल वाठ हे बहीण सोनाली यांना करजगाव येथे मामाकडे नेत होता, तर रमेश नागले हे बहीण शोभा यांना घेऊन अचलपूरला जात होते. यादरम्यान त्यांनी पावसामुळे झाडाखाली आसरा घेतला. नेमका तेव्हाच काळाने घाला घातला.

Web Title: Three death in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.