मध्य प्रदेशातील तलावात बुडून मेळघाटातील तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:30 AM2023-06-13T10:30:19+5:302023-06-13T10:31:47+5:30

मृतांमध्ये बापलेकासह पुतण्याचा समावेश : खेकडे, मासे पकडणे जिवावर बेतले

Three died in Melghat after drowning in a lake in Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील तलावात बुडून मेळघाटातील तिघांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील तलावात बुडून मेळघाटातील तिघांचा मृत्यू

googlenewsNext

चिखलदरा (अमरावती) : गावालगतच्या मध्य प्रदेशातील कवड्या येथील तलावात खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या काजलडोह येथील बाप-लेकासह पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली. मध्य प्रदेश पोलिसांनी पंचनामा व डॉक्टरांकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर सुकाली मरसकोल्हे (३२), सागर शंकर मरसकोल्हे (१३) या बाप-लेकासह पुतण्या आयुष बिरू मरसकोल्हे (१३) (सर्व रा. काजलडोह) अशी मृतांची नावे आहेत. महाराष्ट्रातील काजलडोह शिवाराला लागून मध्य प्रदेशच्या भैसदेही तालुक्यात कवड्या गाव आहे. मेळघाट नजिकच असलेल्या या भागात गावकरी मोठ्या प्रमाणात मासे आणि खेकडे पकडण्यासाठी जातात. रविवारी शंकर व दोन्ही मुले तेथे गेली.

दुपारी दीड वाजता अचानक सागर बुडत असताना शंकर व पुतण्या आयुषने त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी धाव घेतली आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. सायंकाळ झाली तरी तिघेही परत न आल्यामुळे गावकरी व कुटुंबीय तलावाकडे गेले असता, ते तिघेही बुडाल्याचे उघडकीस आले. या घटनेने संपूर्ण गावात व पंचक्रोशीत एकच शोककळा पसरली. घटनेची माहिती भैसदेही पोलिसांना मिळताच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी दुपारी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माय-लेकीचा आक्रोश

शंकर व मुलगा सागर यांचा बुडून मृत्यू झाल्याने शंकरची पत्नी व दहा वर्षीय मुलगी यांचा आक्रोश हृदयाला पाझर फोडणारा होता. आयुषला धाकटा भाऊ आहे. कुटुंबातील तीन सदस्य गेल्याने मरसकोल्हे कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे.

मासे व खेकडे पकडण्यासाठी तिघे तलावात उतरले होते. त्यांचा बुडून मृत्यू झाला. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिले आहेत.

- जयंत मरसकोल्हे, ठाणेदार, भैसदेही (मध्य प्रदेश)

Web Title: Three died in Melghat after drowning in a lake in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.