Amravati | मासेमारीठी गेलेले ३ मच्छिमार नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह गवसले, एकाचा शोध सुरू
By प्रदीप भाकरे | Published: September 17, 2022 03:20 PM2022-09-17T15:20:10+5:302022-09-17T16:54:55+5:30
स्थानिक शेतकरी सकाळी १० च्या सुमारास शेतावर गेला होता. त्यावेळी हा प्रकार त्याच्या लक्षात आला.
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच जिल्ह्याचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांपैकी दोघांचे मृतदेह गवसले असून, तिसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी बघ्यांची देखील माेठी गर्दी झालेली आहे.
शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. तिवसा परिसरातील तीन मच्छिमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले हाेते. त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती तिवसा पोलीस आणि महसूल प्रशासनाला देण्यात आली. घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तीनही मच्छिमार तिवसा तालुक्यातील रहिवासी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पाेहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. दोघांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले असून, त्यांना तिवसा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर रेस्क्यू पथकाकडून तिसऱ्या मच्छिमाराचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.