तीन ते पाच दिवसांपूर्वीच शीतल पाटीलची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:40 PM2018-03-21T22:40:36+5:302018-03-21T22:40:36+5:30
डोक्याच्या आतील भागात गंभीर मार लागल्याने शीतल पाटीलचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदनानंतर इर्विनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : डोक्याच्या आतील भागात गंभीर मार लागल्याने शीतल पाटीलचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदनानंतर इर्विनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. पोलिसांना नुकताच शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये शीतल पाटीलचा मृत्यू मृतदेह आढळण्याच्या तीन ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये, रहमान खां यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आक्रमणचा पदाधिकारी नीलेश मेश्रामला गाडगेनगर पोलिसांनी कलम १५१ अन्वये अटक केली आहे.
मृत शीतल पाटील ही १३ मार्च रोजीच्या सायंकाळी इर्विन चौकात आरोपी सुनील गजभियेसोबत होती. रात्री ८.३० वाजता गजभिये, रहमान खां व शीतल यांचे लोकेशन चांदूर बाजाराजवळील शिरजगाव असे आढळून आले. रात्री १०.२० वाजता शीतलच्या मोबाइलवरून शेवटचा कॉल केला गेला आणि त्यानंतर फोन बंद झाल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. शीतलचा मृत्यू मृतदेह आढळल्याच्या तीन ते पाच दिवसांपूर्वी झाल्याच्या शवविच्छेदन अहवालावरून तिची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे.
शीतल पाटीलच्या हत्येचा आरोप गजभियेसह रहमान व अन्य चार साथीदारांवर असला तरी अद्याप पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागला नाही. गाडगेनगर व गुन्हे शाखेचे पोलीस गजभियेचा शोध घेत आहेत. आरोपींच्या घरावर पाळत ठेवली जात आहे. नातेवाईक व परिचितांचीही कसून चौकशी होत आहे. विविध माहिती व्हेरीफाय करण्यासोबत तांत्रिक पद्धतीनेही शोधकार्य सुरूच आहे.
नीलेश मेश्राम गजभियेच्या संपर्कात
१३ मार्च पासून बेपत्ता असणाऱ्या शीतलचा १६ मार्च रोजीच्या दुपारी विहिरीत मृतदेह आढळून आला. तिच्या मृतदेहाचे १७ मार्च रोजी शवविच्छेदन झाले. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नीलेश मेश्रामने सुनील गजभियेला कॉल केला. मात्र, त्याने उचलला नव्हता. त्यामुळे त्याने शीतलच्या मोबाइलवर कॉल केला. त्यावेळी ती कोर्टात असून, गजभिये कामात असल्याचे शीतलने नीलेशला सांगितले होते. त्यानंतर १६ मार्च रोजी शीतलचा मृतदेह आढळून आला. १७ मार्च रोजी सकाळी शीतलच्या मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, नीलेशने गजभियेला फोनवर माहिती दिली. पाच मिनिटांत येतो, असे गजभियेने नीलेशला सांगितले होते. त्यानंतर गजभियेचा फोन बंद झाला. त्यामुळे नीलेश हा गजभियेच्या संपर्कात होता, ही बाब पोलीस चौकशीत उघड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी त्याला गाडगेनगर पोलिसांनी कलम १५१ अन्वये अटक करून कोतवालीच्या कोठडीत ठेवले.
गजभियेच्या कारचाही शोध
सुनील गजभियेची कार त्याच्या घरी आढळून आलेली नाही. त्यामुळे तो कार घेऊन पसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबधाने त्याच्या कारच्या क्रमांकांची माहिती अन्य पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे.
डीएनए टेस्ट करणार
शीतल पाटीलच्या नातेवाइकांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटविली. मात्र, याची खातरजमा करण्यासाठी मृतदेहाचे रक्तनमुने व तिच्या आई-वडिलांचे रक्तनमुने घेऊन डीएनए टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंबंधाने गाडगेनगर पोलिसांनी पुढील प्रकिया सुरू केली आहे.
बँक खात्याची मागविली माहिती
सुनील गजभिये याच्या बँक खात्यांची माहिती जाणून घेण्याच्या हालचाली पोलिसांनी चालविल्या आहेत. यासंबधाने पोलिसांनी खाते असलेल्या बँकांना पत्र दिल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली.
हत्याकांडातील आरोपी हाती लागलेले नाहीत. गजभियेच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी होत आहे. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू तीन ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.