बडनेऱ्यातून १० लाखांचा गांजा जप्त; तीन आरोपी अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: January 9, 2023 05:03 PM2023-01-09T17:03:53+5:302023-01-09T17:10:50+5:30
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
बडनेरा (अमरावती) : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरातील पाचबंगला परिसरातून जात असलेल्या तिघांकडून ९.९७ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान, यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेचे पथक बडनेरा भागात पेट्रोलिंग करीत असताना काही इसम गांजा घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पाचबंगला परिसरात सापळा रचून त्या तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे ३३ किलो २५० ग्रॅम ओलसर हिरवा गांजा आढळून आला. नईम शहा वल्द नकीम शहा (४९, गवळीपुरा रतनगंज), हबीब शहा वल्द हुसेन शहा (५०, यास्मिन नगर), व शेख वसीम वल्द शेख अयुब (३२, हाजरा नगर, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत. तो गांजा शेख इमरान उर्फ गोलू अण्णा शेख कादर (रा. आझाद नगर) याचा असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. आरोपीविरुद्ध एनडीपीएस ॲक्टनुसार बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोलू अन्नाला ताब्यात घेणार
याप्रकरणी शेख इमरान उर्फ गोलू अन्नाला चाैकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजकिरण येवले, हवालदार अजय मिश्रा, जावेद अहमद, सुधीर गुडदे, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, इजाज शहा, चेतन कराडे, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांनी ही कारवाई केली. अटक तीन आरोपी तो गांजा नेमका कुठे घेऊन जाणार होते, की कुणाला विक्री करणार होते, या दिशेने देखील तपास करण्यात येणार आहे.