झटामझिरी येथे आगीत तीन घरे जाळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:25+5:302021-05-27T04:13:25+5:30
लाखांवर नुकसान, महसूल विभागाने केला पंचनामा वरुड : तालुक्यातील झटामझिरी येथे बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत तीन ...
लाखांवर नुकसान, महसूल विभागाने केला पंचनामा
वरुड : तालुक्यातील झटामझिरी येथे बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली. यामध्ये धान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, सायकल तसेच घरातील संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले.
प्राप्त माहितीनुसार, झटामझिरी येथील सहादेव युवनाते, रामकिसन उईके आणि जगवंती तिडगाम यांच्या घरांना बुधवारी पहाटे अचानक आगीने वेढले. यामध्ये युवनाते यांच्या घरातील गहू, धान्य, कपडे, सायकल, भांडीकुंडी तसेच शेजारच्या दोन घरांतील साहित्यदेखील जाळून खाक झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या वरूड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत तिन्ही घरांची राखरांगोळी झाली होती. यामध्ये अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी भलावी यांनी सांगितले. त्यांनी नुकसानाचा पंचनामा केला. तिन्ही कुटुंबे उघड्यावर आली असून, त्यांनी मदतीची मागणी केली आहे.