अमरावतीत विनयभंगाच्या तीन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 06:00 PM2022-06-28T18:00:38+5:302022-06-28T18:09:52+5:30
अलीकडे अत्याचार, विनयभंग व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमरावती : अलीकडे अत्याचार, विनयभंग व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजमाध्यमांच्या आडून मुली, महिलांची छेड काढण्यासह त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या काही घटनादेखील पोलीस दप्तरी नोंदविण्यात आल्या आहेत. रस्त्यात अडवून छेड काढण्याचे, घरात शिरून विनयभंग करण्यात आल्याचे प्रकार घडत असताना महिलेचे फोटो तिच्याच पतीला पाठवून बदनामीचे प्रकारदेखील उजेडात आले आहेत.
माझ्यासोबत राहा, तुझी जबाबदारी घेतो
माझ्यासोबत राहा, तुझा पूर्ण खर्च करतो, असे म्हणत एका महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करण्यात आला. २५ जून रोजी पहाटे ६ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने नकार दिला असता तिला शिवीगाळ करण्यात आली. ती ओरडली असता, आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २५ जून रोजी सकाळी ११.२४ च्या सुमारास अमोल देशमुख (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग व शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीदेखील आपण नोकरीवर जात असताना आरोपीने आपल्याला रस्त्यात अडविले तथा तुझा नातेवाईक तुझ्यासोबत राहत नाही, त्यामुळे तू माझ्यासोबत राहा, असे म्हटल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
‘ती’चे फोटो पतीला पाठविले
उसनवार घेतलेले पैसे देण्यासाठी मित्राकडे गेलेल्या व रात्रभर तेथेच थांबलेल्या तरुणाने मित्राच्या पत्नीसोबत काही छायाचित्रे काढली तथा ती तिच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पाठविल्याची घटना नवसारी भागात घडली. आरोपीने फिर्यादी महिलेलादेखील टेक्स्ट मेसेज केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २४ जून रोजी आरोपी प्रतीक चक्रनारायण (२०, रा. भीमनगर, ह.मु. बोरगाव मंजू) याच्याविरुद्ध विनयभंग व बदनामीचा गुन्हा दाखल केला. महिलेचा पती व आरोपी परस्परांच्या ओळखीचे आहेत. अशातच १५ जून रोजी प्रतीक नवसारीत पोहोचला. महिलेच्या पतीने रात्रीचे जेवण करू, उद्या जा, असे म्हटल्याने प्रतीक तेथे थांबला. त्या दिवशी रात्री महिला आपल्या घरी झोपली असताना आरोपीने तिच्यासोबत फोटो काढले. ते २२ जून रोजी तिच्यासह पतीला पाठविले.
आधी एकटीला सोडले, नंतर विनयभंग
एवढ्या रात्री मला एकटीला सोडून का गेला, असा जाब विचारणाऱ्या तरुणीचा तिच्याच मित्राकडून विनयभंग करण्यात आला. त्याच्या गर्लफ्रेंडने तिला मारहाण केली. भीमनगर परिसरात २४ जून रोजी रात्री १२ च्या सुमारास हा प्रसंग घडला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी पलाश रायहोले व एका महिलेविरुद्ध २५ जून रोजी सकाळी गुन्हा दाखल केला. रहाटगावकडे जेवायला निघालेल्या पलाशला मध्येच त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. त्यामुळे तरुणीला तेथेच सोडून पलाश एकटाच भीमनगरला निघून आला. पाठोपाठ तरुणीदेखील भीमनगरात पोहोचली. तेथे तू येथे कशी काय आलीस व तू मला का सोडून आला, अशी परस्पर विचारणा करण्यात आली. मला दिसायचे नाही, अशी धमकीदेखील तिला देण्यात आली.