तीन अपहरणकर्त्यांचा अमरावतीच्या लॉजवर आठ दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:25 AM2021-02-21T04:25:21+5:302021-02-21T04:25:21+5:30

अमरावती : शरदानगर येथील चार वर्षीय चिमुकल्याच्या अपहरणापूर्वी आरोपी शहरातील लॉजवर आठ दिवस मुक्कामाला होते. यादरम्यान घराची रेकी करण्यात ...

Three kidnappers stay at Amravati lodge for eight days | तीन अपहरणकर्त्यांचा अमरावतीच्या लॉजवर आठ दिवस मुक्काम

तीन अपहरणकर्त्यांचा अमरावतीच्या लॉजवर आठ दिवस मुक्काम

googlenewsNext

अमरावती : शरदानगर येथील चार वर्षीय चिमुकल्याच्या अपहरणापूर्वी आरोपी शहरातील लॉजवर आठ दिवस मुक्कामाला होते. यादरम्यान घराची रेकी करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

पोलीस सूत्रांनुसार, अपहृत चिमुकल्याची सावत्र आजी व या प्रकरणातील आरोपी मोनिका लुनिया हिचे अहमदनगर हे माहेर आहे. अपहरणकर्त्यांपैकी एक हिना देशपांडे व मोनिका या मैत्रिणी आहेत. त्याकारणाने हिना ही अमरावतीला मोनिकाकडे अधूनमधून यायची. आठ ते पंधरा दिवस वास्तव्याला असल्याने चिमुकलाही तिच्याशी परिचित होता.

मोनिकाचे आई-वडील लहानपणीच वारले. त्यामुळे अहमदनगर येथे ज्या गृहस्थाने तिचे पालनपोषण केले, त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने मोनिका अधूनमधून त्यांना पैसे पाठवित होती. यादरम्यान मुलाचे आजोबा अर्थात आपला नवरा फळाचा मोठा व्यापारी व त्यांचे इतरही अनेक व्यवसाय असल्याने त्याच्याकडून मोठी रक्कम मिळेल. यासाठी मुलाचे अपहरणनाट्य घडवून आणायचे करायचे, असा प्लॅन मोनिकाच्या डोक्यात शिजत होते. तिने यासाठी हिनाची मदत घेण्याचे ठरविले. हिनाने मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू याच्याशी दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. त्याने बंबईया ऊर्फ अलमास ताहीर शेख व आसिफ युसूफ शेख यांना हिनाच्या सोबतीला दिले. तिघांनी चित्रा चौक व रेल्वे स्टेशन चौकातील लॉजवर आठ दिवस मुक्काम केला. यादरम्यान हिना ही मोनिकाच्या फोनवर संपर्कात होती. शारदानगर येथील घराची रेकीदेखील त्यांनी केली. बुधवार हा अपहरणाचा दिवस ठरला.

मोनिका बुधवारी घटनास्थळावरील खुल्या मैदानाजवळ नातवांना मुद्दाम घेऊन गेली. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीने चिमुकल्याला पळवून नेले. यावेळी मोनिकाने आरडाओरड केली नाही, मात्र चिमुकल्यासोबत असलेल्या बहिणींनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.

राजापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून सर्वप्रथम मोनिकाला ताब्यात घेतले. तिच्याकडून ‘अहमदनगर कनेक्शन’चा खुलासा झाल्यानंतर पोलीस पथकांनी अहमदनगर गाठले. हिनासह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चिमुकल्याला अहमदनगर शहरातील कोठला झोपडपट्टीत ठेवल्याचे सांगितले. या माहितीवरून आसिफ व फिरोजच्या मुसक्या आवळून चिमुकल्याला सुखरूप ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

Web Title: Three kidnappers stay at Amravati lodge for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.