चार वाहनांचा विचित्र अपघात; तीन ठार, १० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:43 AM2023-02-08T10:43:43+5:302023-02-08T10:44:56+5:30

तीन दुचाकी, काळीपिवळी धडकली; आसेगावजवळची घटना

Three killed, 10 injured in freak accident involving four vehicles on dhamangaon yavatmal route | चार वाहनांचा विचित्र अपघात; तीन ठार, १० जखमी

चार वाहनांचा विचित्र अपघात; तीन ठार, १० जखमी

googlenewsNext

धामणगाव रेल्वे (अमरावती) : धामणगाव - यवतमाळ रस्त्यावरील आसेगावजवळ तीन दुचाकी व काळी पिवळीचा विचित्र अपघात झाला. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन जण ठार तर दहा जण जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

स्वाती विजय मेश्राम (३०, रा. सुपलवाडा), अवि डहाके (२५, रा. भातकुली, सावंगी मेघे), प्रतीक मसराम (२७, रा. बोरगाव मेघे, वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात आसेगाव ते जळकापटाचे दरम्यान शेंडे यांच्या शेताजवळ झाला. यवतमाळकडून धामणगावकडे येत असलेल्या काळी पिवळी वाहनावर मागून येत असलेली दुचाकी व समोरील दोन दुचाकी धडकल्या. या अपघातात स्वाती मेश्राम घटनास्थळी ठार झाल्या. तर, अवि डहाके व प्रतीक मसराम यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. काळी पिवळीमध्ये प्रवास करत असलेल्या सत्यभामा शामराव खडसे (५९, रा.धामणगाव), पौर्णिमा देविदास माहुरे (५७, अमरावती), प्रवीण भिसेन (२३, वर्धा), अनुसया मेश्राम (सुपलवाडा), शेख नूर (४५, रा. तळेगाव दशासर), विठ्ठल भलावी (५५, वाघोडा), पंचाबाई मेश्राम (४८, रा. सुपलवाडा), मनोज भाजीपाले यांच्यासह दहा जण गंभीर जखमी झाले.

त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अमरावती व यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पवन शिंदे आणि अखिलेश पोळ यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधून माणुसकी जोपासत कार्यतत्परता दाखविली. दरम्यान तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, दत्तापूर येथील पोलिस चमू दाखल झाले.

सून जागीच ठार; तर दोन जावा गंभीर

मूळचे चांदुर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथील रहिवासी असलेले मेश्राम कुटुंब हे यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा येथे कामानिमित्त गेले होते. दरम्यान, काळीपिवळी वाहनात परत येत असतांना हा विचित्र अपघात घडला. या अपघातात काळीपिवळी उलटली. त्यात कुटुंबातील सून स्वाती मेश्राम ही वाहनाखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाली. तर त्याच कुटुंबातील दोन्ही जावा अनुसया मेश्राम व पंचाबाई मेश्राम या गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मोबाइल गिफ्ट घेण्यासाठी जाताना काळाची झडप

मित्राचा वाढदिवस असल्याने आपल्या मावशीच्या गावावरून एका मित्राला सोबत आणले. वाढदिवशी मित्राला मोबाइल गिफ्ट देणे ठरले आणि दोन मोटारसायकलवर धामणगावसाठी निघाले. या अपघातात दोघे जिवलग मित्र ठार झाले. काळी पिवळी मॅजिक व तीन मोटारसायकलमध्ये झालेल्या या अपघातात धामणगाव तालुक्यातील भातकुली येथील अविनाश बाबाराव डहाके (वय २८), बोरगाव मेघे येथील प्रतीक मसराम (२७) यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वी मृत्यू झाला. अविनाश हा आपल्या मावशीकडे बोरगाव मेघे येथे मिस्त्रीचे काम करत होता, तर प्रतीक हा देवळी येथे महालक्ष्मी कंपनीत कामाला होता. अविनाशच्या भातकुलीतील एका मित्राचा वाढदिवस असल्याने हे तिघेही धामणगाव रेल्वे येथे मोबाइल घेण्यासाठी आले होते. झालेल्या अपघातात दोघेही ठार झाले.

Web Title: Three killed, 10 injured in freak accident involving four vehicles on dhamangaon yavatmal route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.